शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळ पावमध्ये आढळले झुरळ; FDA कडून उपहारगृह सील.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उपहारगृहातील मिसळ पावमध्ये मृत झुरळ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने धाड टाकून तपासणी केली आणि संबंधित उपहारगृह सील केले.

विशेष म्हणजे, या उपहारगृहाचा करार तब्बल दोन वर्षांपूर्वीच संपला असूनही ते विनापरवाना सुरू असल्याचा गंभीर प्रकार तपासात समोर आला आहे.

सिंधुदुर्ग:

​रुग्णांच्या आरोग्याची आणि उपचारांची काळजी घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातील उपहारगृहात अन्नसुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने मागवलेल्या मिसळ पावमध्ये मृत झुरळ मिळाल्यानंतर, याप्रकरणी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​या गंभीर घटनेची दखल घेत संतप्त नागरिकाने थेट अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी (२८ ऑगस्ट) संबंधित उपहारगृहाची अचानक पाहणी आणि झाडाझरती घेतली.

​तपासणीदरम्यान उपहारगृहातील अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले. अन्नपदार्थ आणि साहित्यामध्ये झुरळांचा वावर आढळला, तर साखरेच्या गोदामात मुंग्या फिरत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही स्वच्छता किंवा कीटक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था तेथे नव्हती, तसेच काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्‍याचेही तपासात स्पष्ट झाले.

​या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली ती म्हणजे, या उपहारगृहाचा अधिकृत करार तब्बल दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आला होता. असे असतानाही सुनील जाधव आणि पराग नलावडे यांच्या माध्यमातून हे उपहारगृह बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली, ज्यामुळे मुदत संपल्यानंतरही ते कसे सुरू होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

​अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उपहारगृहातून विविध अन्नपदार्थांचे आणि साहित्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवालात ते दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व आणखी कठोर कारवाई केली जाणार असून, त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुधारणा होईपर्यंत उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search