अंबरनाथ-गोरपे गावात ११,५०० वृक्षांची लागवड करून मानवनिर्मित जंगल उभारणी!

   Follow us on        

अंबरनाथ तालुक्यात झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रचंड विस्तार यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून प्रशासनासमोर गंभीर पर्यावरणीय आव्हाने उभी ठाकली आहेत. या वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी बदलापूर वनविभागाने एक अत्यंत स्तुत्य आणि दूरगामी पाऊल उचलले आहे. अंबरनाथ औद्योगिक वसाहतीला अगदी लागून असलेल्या गोरपे गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या तब्बल २५ एकर जमिनीवर हा नाविन्यपूर्ण वृक्षारोपण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

​या पर्यावरणपूरक मोहिमेत बदलापूर वनविभागासह टाटा रियॅलिटी आणि एके रूरल ट्रस्ट यांनी एकत्रित येत सहकार्य दर्शवले असून, या संयुक्त विद्यमानाने या व्यापक उपक्रमाला प्रत्यक्ष सुरुवातदेखील करण्यात आली आहे. बदलापूर वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि आंबे परिमंडळ अधिकारी सिद्धार्थ मोने यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच टाटा रियॅलिटी आणि एके रूरल ट्रस्टचे प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

​याआधीदेखील बदलापूर वनविभागाने अंबरनाथ तालुक्यातील मांगलरूळ आणि गोरपे गावाला लागून असलेल्या पाले गावाच्या हद्दीत अशाच प्रकारची यशस्वी वृक्षलागवड मोहीम राबवली होती. त्या ठिकाणी लावलेल्या रोपांचे आता एका घनदाट मानवनिर्मित जंगलात रूपांतर झाले असून संपूर्ण परिसराने सुंदर आणि हिरवेगार रूप धारण केले आहे. याच यशस्वी आणि उत्तम प्रयोगाची पुनरावृत्ती आता गोरपे परिसरात केली जात असून याद्वारे औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठे हरित कवच तयार होण्यास मदत मिळणार आहे.

​अंबरनाथ शहर आणि त्याचा लगतचा औद्योगिक परिसर अतिशय वेगाने विकसित होत असल्याने परिसरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि प्रदूषण चिंताजनकsf रीतीने वाढले आहे. यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिरवाई निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे गोरपे आणि पालेगाव परिसरातील हे नवनवे विकसित होणारे वनक्षेत्र भविष्यात अंबरनाथ शहरासाठी एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचे प्राणवायू केंद्र ठरणार असून, यामुळे केवळ शहराचे पर्यावरणीय संतुलनच अबाधित राहणार नाही, तर येथील हवेची गुणवत्ता सुधारण्यासही मोलाची मदत मिळणार आहे.

​फक्त एकदाच वृक्षारोपण करून थांब नसून, लावलेल्या रोपांचे योग्य संवर्धन आणि जोपासना करण्यावरही वनविभागाकडून विशेष भर दिला जाणार आहे. या संपूर्ण परिसरात एक मोठे व समृद्ध मानवनिर्मित जंगल फुलवून येथील जैवविविधता वाढवणे, तसेच विविध पक्षी व वन्यजीवांसाठी एक सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवास तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अंबरनाथच्या बिघडत्या पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढीच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search