सावंतवाडी: बेकायदेशीरपणे विनापरवाना बाळगण्यात आलेल्या चार बंदुका आणि खवले मांजर या संरक्षित वन्यजीवाचे खवले बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई करत चार जणांविरोधात कायदेशीर पावले उचलली आहेत. या यशस्वी कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध प्रकारच्या चार बंदुकांसह १,१३५ ग्रॅम वजनाचे लहान आणि मोठे मिळून एकूण १४४ खवले हस्तगत केले आहेत, ज्याची बाजारभावातील किंमत तब्बल ७०,४५० रुपये इतकी आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजे देवसू येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकले. यातील पहिल्या कारवाईत देवसू पलीकडचीवाडी येथील गजानन उर्फ अर्जुन सावंत याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातुन एक काडतुसाची बंदूक, एक ठासणीची बंदूक आणि १,१३५ ग्रॅम वजनाचे एकूण १४४ खवले जप्त करण्यात आले.
दुसऱ्या एका कारवाईदरम्यान दाणोली गावणवाडी येथील अशोक लक्ष्मण सावंत यांच्या निवासस्थानावर धाड टाकून पोलिसांनी पंचवीस हजार रुपये किमतीची एक ठासणीची बंदूक जप्त केली, तर तिसऱ्या कारवाईत देवसू जाधववाडी येथील संतोष विठ्ठल जाधव यांच्या घरून देखील २५ हजार रुपये किमतीची एक ठासणीची बंदूक हस्तगत करण्यात आली.
या सखोल तपासणीदरम्यान असे निष्पन्न झाले की, संतोष जाधव यांच्याकडे सापडलेली बंदूक सुरज धर्मेंद्र सावंत याने त्यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती, ज्यामुळे या गुन्ह्यामागील इतर दुवे देखील उजेडात आले. पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी केलेल्या यशस्वी कारवायांमधून एकूण चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही संपूर्ण धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश राऊत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनखाली तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील आणि इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे.


