सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेपैकी पाच नवीन गाड्यांचे सावंतवाडी बसस्थानकामध्ये थाटात आगमन झाले. या नवीन बसफेऱ्यांच्या स्वागतानंतर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि नारळ फोडून या बससेवेचे जनतेसाठी अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर आमदार केसरकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह याच नवीन बसमधून प्रसिद्ध मोती तलावापर्यंत एक आनंददायी सफर देखील केली.
या विशेष प्रसंगी संवाद साधताना आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण ३० नवीन गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मंजुरीमधील सावंतवाडी विभागासाठी १०, तर वेंगुरला आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांसाठी प्रत्येकी ५ नवीन गाड्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या पहिल्या टप्प्या अंतर्गत पाच बसेस दाखल झाल्या असून आगामी गणेशोत्सवाच्या सणात प्रवाशांना सर्वोत्तम आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सध्या सुरू असलेल्या सावंतवाडी बसस्थानकाच्या कामासंदर्भात बोलताना, गणेशोत्सवाच्या कालावधीत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय सहन करावी लागू नये, यासाठी बसस्थानका परिसरातील खडे भरण्याचे व दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या शानदार लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे अनेक प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी यांच्यासह अजय गोंदावले, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगलकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे, सत्यवान बांदेकर, बबलू मिसाळ, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव, विवेक म्हापसेकर, विशाल सावंत यांसह पक्षाचे इतर अनेक सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.


