राज्याच्या खोल समुद्रात आता होणार ‘मसल फार्मिंग’ आणि कोबिया माशांचे संवर्धन

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचा विस्तार करण्यासाठी आता राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत, राज्याच्या खोल समुद्रात ‘मसल फार्मिंग’ (कालवे पालन) करण्यासोबतच, ‘केजिंग’ म्हणजेच जाळ्यांच्या सहाय्याने कोबिया या माशांच्या प्रजातीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​या संदर्भात मंत्रालय येथे ‘मदर ओसियन’ या कंपनीतर्फे एका विशेष प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कंपनीचे संचालक मितेश शहा यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, तसेच कंपनीचे इतर संचालक मितेश शहा, बियॉन्ड एस्पॉय, प्रेमदीप व्होरा आणि तपन सामंत आदी वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

​मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले की, खोल समुद्रातील या मत्स्यसंवर्धनामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होईल. तसेच, या उपक्रमामुळे आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून, मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार निर्मितीसोबतच गुंतवणुकीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

​या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिक मच्छिमारांच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले आहेत. स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जावा, जेणेकरून त्यांचा विरोध टाळून सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवता येईल, यावर त्यांनी भर दिला.

​प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना असे स्पष्ट करण्यात आले की, या उपक्रमांतर्गत खोल समुद्रात सुमारे ६० मीटर आकाराचे जाळे उभारले जाणार आहे. त्या जाळ्यामध्ये कोबिया या माशांच्या जातीचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि संवर्धन केले जाईल. यासोबतच, खोल समुद्रात ‘मसल’ म्हणजेच कालवे पालन करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देखील यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search