सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमध्ये जागतिक दर्जाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाचा विकास होऊन रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यात जागतिक दर्जाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या पुढाकारातून आणि मंत्र्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या नवीन शक्यता निर्माण होणार आहेत.
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) समूहामार्फत साकार होणाऱ्या या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार नाही, तर पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन स्थानिक जमीनधारकांना सोबत घेत एक त्रिपक्षिय करार केला. या कराराच्या अंमलबजावणीमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हा प्रकल्प पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ धोरणानुसार एक मैलाचा दगड मानला जात आहे. रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांकडे गेलेल्या कोकणातील तरुण-तरुणींना आता आपल्याच मायभूमीत, आपल्याच जिल्ह्यात रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे तरुण पुन्हा आपल्या गावी परतण्यास प्रोत्साहित होतील, ही मोठी जमेची बाजू आहे.
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. ‘ताज’सारख्या नामांकित जागतिक ब्रँडच्या आगमनामुळे येथील स्थानिक हॉटेल व्यावसायिक, वाहतूक सेवा आणि इतर सेवा क्षेत्राला थेट लाभ होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


