सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेले पारपोली गाव हे निसर्गसौंदर्याने आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेले आहे. राज्य सरकारने या गावाला महाराष्ट्रातील पहिले ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून घोषित केले आहे. आता या गावाची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली असून फ्रान्सहून आलेले पर्यटक सेबॅस्टियन यांनी पारपोलीला विशेष भेट देऊन येथील समृद्ध पर्यावरणाचा आणि विहंगम दृश्यांचा आनंद घेतला आहे.
पारपोली म्हणजे केवळ एक साधारण गाव नसून निसर्गाची एक जिवंत प्रयोगशाळाच मानली जाते. येथे सुमारे १८० हून अधिक प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरे आढळतात. निसर्गाच्या या मोकळ्या दालनात तब्बल २०० हून अधिक दुर्मीळ प्रजातींचे वास्तव्य असून फुलपाखरांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण येथे उपलब्ध आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या सेबॅस्टियन यांनी वन समितीचे अनुभवी गाईड राजेश कवठकर यांच्याकडून फुलपाखरांचे जीवनचक्र, त्यांच्या प्रजाती आणि अधिवासाची सविस्तर माहिती घेतली व ही नयनरम्य दृश्ये कॅमेऱ्यात टिपली.
या दौऱ्यात केवळ निसर्गानेच नव्हे, तर येथील स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैलीनेही परदेशी पर्यटकाला आकर्षित केले. पारपोली येथील एका पारंपरिक निवासस्थानी राहून सेबॅस्टियन यांनी कोकणी घरांची रचना आणि जिव्हाळा अनुभवला. त्याचबरोबर उकड्या तांदळाचा भात, आमटी, सोलकढी, स्थानिक भाज्या आणि भजी अशा अस्सल मालवणी भोजनाचा आस्वाद घेत त्यांनी कोकणी माणसाच्या साधेपणाचे व आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले.
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सेबॅस्टियन यांनी सांगितले की, पारपोलीच्या अद्भूत निसर्गाने त्यांना अक्षरशः भुरळ घातली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फुलपाखरे पाहणे हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय आणि आनंददायी क्षण ठरला आहे. येथील शांतता आणि लोकांचा आपुलकीचा स्वभाव त्यांना खूप आवडला असून, भविष्यात ते आपल्या मित्र-परिवारासह पुन्हा एकदा या गावात नक्की भेट देतील, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शासनस्तरावर पारपोलीला ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून मिळालेल्या अधिकृत ओळखीमुळे आता इथे देश-विदेशातील अभ्यासक, छायाचित्रकार आणि पर्यटकांची पावले सातत्याने वळू लागली आहेत. यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर पारपोली हे गाव आता एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय आकर्षण केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे.


