ओंकार’ हत्तीला पळवून लावण्यासाठी आगीचे गोळे फेकले; वनविभागाच्या कृत्याविरुद्ध संताप

   Follow us on        

गेल्या दोन महिन्यांपासून बांदा आणि आसपासच्या भागात वावरणार्‍या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीचे गोले तसेच ॲटमबॉम्बचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या अमानुष पद्धतीमुळे वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्राण्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जबाबदार कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

​काही दिवसांपूर्वी शेर्ले टेकूळवाडी भागात भातशेतीमध्ये शिरलेल्या ओंकार हत्तीच्या दिशेने ज्वाळा आणि आगीचे गोळे फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. याआधी इन्सुली येथील गणपती मंदिराच्या मागील परिसरातही या हत्तीला काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. हत्तीला पळवण्यासाठी जर अशा हिंसक आणि असुरक्षित मार्गांचा वापर केला गेला, तर परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक बिघडून हत्ती हिंसक बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हत्तीवर आगीच्या मशाली फेकणाऱ्या व्यक्ती वनविभागाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने या घटनेची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करून खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. यापूर्वी काठ्यांनी मारहाण आणि आता थेट आगीचा वापर करून हुसकावण्याचा प्रयत्न झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये केवळ शेतीचे अथवा पिकांचे नुकसान होत नाही, तर हत्ती आणि माणूस या दोघांच्याही प्राणाला गंभीर धोका निर्माण होतो. गर्दी जमवणे, हत्तीला चिथावणे, मोठा आवाज करणारे फटाके फोडणे किंवा आगीचा वापर करणे यांसारख्या गोष्टींमुळे हत्ती अधिक अस्वस्थ आणि आक्रमक होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालून केवळ प्रशिक्षित पथकांच्या माध्यमातूनच परिस्थिती हाताळण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.

​ओंकार हत्तीने गेल्या काही दिवसांत काप, मडुरा, शेर्ले, आरोसबाग आणि बांदा अशा अनेक गावांमध्ये भ्रमंती केली असून त्याच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष आहे. मात्र, हत्तीचा मानवी वस्त्यांमध्ये सातत्याने होणारा वावर लक्षात घेता, केवळ त्याला हाकलून लावणे हा एकमेव उद्देश न ठेवता माणूस आणि प्राणी दोघांच्या सुरक्षेसाठी वैज्ञानिक आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search