१ ऑक्टोबर २०२६ पासून एसटी बसमधून सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
या कार्डची नोंदणी, टॉप-अप तसेच आधार OTP द्वारे नोंदणीची सुविधा राज्यातील विविध बसस्थानक व आगारांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
Follow us onमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या प्रवास सवलतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून या सर्व घटकांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. सवलतीच्या प्रवासाचे डिजिटल व्यवस्थापन अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असून, राज्यभरातील आगारे आणि बसस्थानकांवर कार्ड वितरण व नोंदणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
१ ऑक्टोबरनंतर केवळ NCMC कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट दिले जाणार असल्याने प्रवाशांनी त्यापूर्वीच नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या प्रवाशांकडे आधीच चालू स्थितीतील (Active) NCMC कार्ड आहे किंवा ज्यांनी नवीन नोंदणी करून QR कोड असलेली पावती मिळवली आहे, त्यांनाच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीनंतर मिळालेल्या पावतीवरील QR कोड वाहकाच्या ईटीएम (ETM) मशीनवर स्कॅन करून तिकीट मिळवता येईल.
ही नोंदणी पावती ३० दिवसांच्या कालावधीसाठीच ग्राह्य धरली जाणार आहे, त्यामुळे या कालावधीत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड सक्रिय (Active) करून त्यात टॉप-अप करून घेणे आवश्यक आहे. नोंदणी व कार्ड वितरणाची जबाबदारी ‘ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या संस्थेकडे सोपवण्यात आली असून, एसटी आगार, बसस्थानके तसेच आगाराबाहेरील अधिकृत केंद्रांवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी प्रवाशांना BHIM ॲपद्वारे टॉप-अप करण्याची सोय देण्यात आली आहे. यासाठी कार्डच्या मागील बाजूस दिलेला QR कोड BHIM ॲपवरून स्कॅन करून सहजरीत्या टॉप-अप करता येईल. शिवाय, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे फिंगरप्रिंट किंवा बायोमेट्रिक जुळत नाहीत, त्यांच्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवून नोंदणी करण्याची पर्यायी कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, सोपा आणि आधुनिक करण्याच्या हेतूने ही प्रणाली लागू केली आहे. सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वीच आपली NCMC कार्ड नोंदणी पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.


