कोकण रेल्वे मार्गावर अत्यंत दिमाखात आणि मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आलेल्या सीएसटी-सावंतवाडी एक्स्प्रेसबाबत चाकरमान्यांमध्ये सुरुवातीपासूनच तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. गाडीच्या प्रवासात असणारी अस्वच्छता, खराब झालेली आसने आणि शौचालयांची दुरवस्था यामुळे प्रवासी आधीच त्रस्त होते. त्यातच आता रेल्वे प्रशासनाकडून अचानक रेल्वेचे डबे बदलण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटलेल्या आणि परतीच्या प्रवासात असलेल्या रेल्वे क्रमांक १२५३४-१२५३३ सावंतवाडी एक्स्प्रेसमधील ‘A2’, ‘HA1’ आणि ‘3AC इकॉनॉमी’ चे तीन असे एकूण पाच महत्त्वाचे वातानुकूलित (एसी) डबे अचानक काढण्यात आले. प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंगद्वारे एसी सीट्सचे पूर्ण भाडे भरलेले असतानाही, रेल्वे प्रशासनाकडून त्यांना थेट स्लीपर कोचमध्ये बसवून प्रवास करावा लागला. पूर्ण भाडे वसूल करूनही स्लीपर कोचची सोय केल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
विशेष म्हणजे, ही एक्स्प्रेस रेल्वे सावंतवाडीहून सीएसटीकडे गेल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ‘नबाबांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊ शहराकडे ‘पुष्पक एक्स्प्रेस’ म्हणून रवाना केली जाते. असे असतानाही, हीच अस्वच्छ आणि एसी डबे काढलेली रेल्वे गाडी सीएसटी स्टेशनवरून लखनऊकडे पाठवली जात असल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
गणेश चतुर्थी सणाच्या पूर्वसंध्येला या नियमित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ रात्री ११:४५ वाजता सीएसटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता. सुरुवातीला फुलांनी सजवून ही गाडी मार्गावर धावती करण्यात आली खरी, मात्र अवघ्या काही दिवसांतच या गाडीची दुरवस्था झाली असून प्रत्यक्षात या गाडीचा मनस्ताप कोकणवासीयांना सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून सीएसटी-सावंतवाडी एक्स्प्रेसला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. अवघ्या काही दिवसांतच समोर आलेल्या या ढिसाळ कारभारामुळे कोकण रेल्वे प्रशासन आणि राजकीय मंडळींबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


