कोकण रेल्वे मार्गावरील असनोटी आणि कारवार स्थानकांदरम्यान १ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आवश्यक ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकचे काम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तांत्रिक कामाचा थेट परिणाम या मार्गावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या माहितीसाठी नवीन वेळापत्रकाची सविस्तर यादी जाहीर केली आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत मडगाव आणि मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या प्रवासात अंशतः बदल करण्यात आले आहेत. १, ८ आणि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक ५६६१६ मंगळुरू सेंट्रल – मडगाव जंक्शन एक्सप्रेस ही कारवारपर्यंतच चालवली जाणार असून कारवार ते मडगाव दरम्यान अंशतः रद्द राहील. तसेच याच तारखांना सुटणारी गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन – मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस मडगावऐवजी कारवार स्थानकातून तिच्या निर्धारित वेळेत सुटेल.
काही विशिष्ट दिवशी मडगाव येथून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत फेरबदल (रिशेड्युल) करण्यात आले आहेत. २, ४, ९, ११, १६ आणि १८ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार व रविवार) रोजी मडगाव येथून सुटणारी गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन – मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस तिच्या निश्चित वेळेपेक्षा ९० मिनिटे उशिराने सुटेल. याशिवाय ६, १३ आणि २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार) रोजी हीच गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा १६० मिनिटे उशिराने रवाना होईल.
रेल्वे मार्गावरील या कामामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ठिकठिकाणी नियंत्रण केले जाणार आहे. ७ आणि १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९०५७ सूरत – मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस मडगाव ते काणकोण दरम्यान २५ मिनिटे रोखून धरली जाईल. तसेच २, ९ आणि १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम जंक्शन – पुणे एक्सप्रेस कुंदापूर ते कारवार दरम्यान १४० मिनिटे नियंत्रित केली जाईल.
याचप्रमाणे ४, ११ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक ११०९७ पुणे – एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस मडगाव ते कारवार दरम्यान १४० मिनिटांसाठी रोखली जाईल. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी खेद व्यक्त केला असून, सर्व प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


