सावंतवाडी टर्मिनसच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोकण रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. परंतु, ही इमारत प्रस्तावित जागेवर उभारल्यास भविष्यात पाचव्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मसाठी पुरेशी जागा शिल्लक राहणार नाही, ही बाब कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने निदर्शनास आणून दिली. या समस्येची दखल घेत माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर ५ वा प्लॅटफॉर्म आणि पर्यटक सुविधांची कामे एकाच वेळी पूर्ण व्हावीत यासाठी सध्याच्या इमारतीच्या कामाला १५ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सुरुवातीला पर्यटन सुविधा विकसित करण्याचा विचार होता. मात्र, तिथे खांबांचे काम करताना भूमिगत केबल तुटून रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यासाठी मंजूर झालेला निधी बाजूच्या जमिनीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. आता रेल्वे अधिकाऱ्यांची एक विशेष टीम लवकरच या जागेची पाहणी करणार असून, प्लॅटफॉर्म व पर्यटक सुविधेचे काम एकत्रितपणे पूर्ण केले जाईल. यामुळे टर्मिनसवर अतिरिक्त गाड्या थांबण्यास मदत होईल.
रेल्वे स्थानकावर गाड्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून एक विशेष योजना आखण्यात आली असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तिलारी प्रकल्पातून साकारल्या जाणाऱ्या या योजनेद्वारे मळगाव, न्हावेली, निरवडे आणि वेत्य या गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाईल. तसेच हे पाणी पुढे चिपी विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रस्ते विकासाबाबत माहिती देताना केसरकर यांनी सांगितले की, मळगाव-रेडी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शक्तीपीठाचा रेडी बंदराला जोडणारा मार्ग मळगाववरून नेण्यात येणार असून चौकुळ व आंबोलीलाही कनेक्टरने जोडले जाईल. यामुळे सिंधुदुर्गात येणारी वाहतूक नॅशनल हायवेने थेट गोव्याच्या दिशेने सुरळीतपणे प्रवास करू शकेल. फ्लायओव्हरच्या कामासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे सावंतवाडीसह कुडाळ, कणकवली, मालवण आणि देवगड या भागांतील पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळणार आहे. कोकण एक्स्प्रेस वे, कोस्टल रोड आणि नॅशनल हायवे हे तिन्ही मार्ग एकमेकांशी जोडले जाणार असल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीची आणि विकासाची एक नवी दिशा प्राप्त होणार असल्याचे केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


