गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीने आता जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमेश्वर येथे गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या रूपात अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनादरम्यान संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत या संदर्भातील मागणीची अधिकृत नोंद करण्यात आली असून, सध्या या आगळ्यावेगळ्या तक्रारीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
या अनोख्या आंदोलनाद्वारे प्रामुख्याने १०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या चार प्रमुख साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर तात्काळ थांबा देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
संगमेश्वर रोड स्थानकावर या गाड्यांना थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह आसपासच्या परिसरातील हजारो प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज आणि स्थानकावरील गर्दी लक्षात घेऊन या चारही एक्सप्रेस गाड्यांना लवकरात लवकर थांबा मंजूर करावा, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.



