संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी ठरला उपविजेता
संगमेश्वर:
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा-संगमेश्वर संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. या स्पर्धेत शाळेचा होतकरू खेळाडू कुमार पुष्कर दत्ताराम गिते याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक (रजत पदक) पटकावला आहे.
पुष्करने १९ वर्षांखालील वयोगटातील ग्रीको-रोमन प्रकारातील ६७ किलो वजनी गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. या अतिशय अटीतटीच्या सामन्यात त्याने चमकदार खेळ करत दुसरा क्रमांक मिळवला आणि आपल्या शाळेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.
क्रीडाप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव:
पुष्करच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच परिसरातील क्रीडाप्रेमींनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
कुस्ती क्षेत्रातील या दैदिप्यमान यशामुळे पुष्करकडून आगामी काळात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारच्या उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा संगमेश्वर परिसरातील क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.


