मुंबईहून मडगावच्या दिशेने निघालेल्या ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. आज (२९ सप्टेंबर) सकाळी सुमारे सात वाजल्यापासून ही रेल्वे गाडी पेण रेल्वे स्थानकातच रखडली असून, यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
प्रवाशांचा संताप आणि रेल्वे प्रशासनाची अनास्था:
सदर गाडीत अडकलेल्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी दीर्घकाळ रखडल्यामुळे टीसींकडे (Ticket Collector) विनंती करण्यात आली होती की, आमच्या शेजारच्या रुळावरून तेजस, मंगला, ऋषिकेश यांसह पॅसेंजर आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्या जात आहेत, ज्यांपैकी काही गाड्या रिकाम्याही आहेत. या गाड्यांना पेण स्थानकात एक-दोन मिनिटे थांबवून आम्हाला त्यात बसण्याची परवानगी दिली जावी, जसे की एसटी बसेस किंवा बेस्ट बसेसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ व्यवस्था केली जाते.
मात्र, टीसींनी स्टेशन मास्तरांद्वारे वरिष्ठांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांनी प्रवाशांच्या या साध्या आणि मानवीय विनंतीला स्पष्ट नकार दिला. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तातडीच्या उपायांसाठी ‘एसओपी’ (SOP) ची मागणी
अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडाच्या प्रसंगी, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांची मुख्य काळजी वाहून त्यांना तात्काळ पर्यायी किंवा त्याच मार्गावरून जाणारी इतर गाडी उपलब्ध करून देण्याची गरज असते. त्यासाठी अशा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता रेल्वे प्रशासनाने तातडीने एक नवीन एसओपी (Standard Operating Procedure – नियमावली) तयार करावी, असा जोरदार आग्रह आता अडकलेल्या प्रवाशांकडून धरला जात आहे.


