Konkan Railway: प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाकडून २२ ऑगस्ट २०२६ रोजी एका विशेष प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीन प्रमुख च्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आता काही स्थानकांवर सुधारित वेळेनुसार पोहोचणार व सुटणार आहेत.
या बदलांतर्गत ट्रेन नंबर १६५८६ मुरुडेश्वर – सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल, बेंगळुरू डेली एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही गाडी बांउडवाळा, काबका पुत्तूर आणि सुब्रह्मण्य रोड या स्थानकांवर पूर्वीपेक्षा ५ मिनिटे आधी येईल. मुरुडेश्वर येथून २५ ऑगस्ट २०२६ रोजी सुटणाऱ्या फेरीत ही नवीन वेळ लागू होणार आहे.
ट्रेन नंबर २२९०८ हापा – मडगाव जंक्शन एक्सप्रेसच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला असून रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांवर ही गाडी पूर्वीपेक्षा १० ते १२ मिनिटे आधी पोहोचेल. हापा येथून २६ ऑगस्ट २०२६ रोजी सुटणाऱ्या गाडीपासून हा बदल अंमलात येणार आहे.
तसेच ट्रेन नंबर १६५९६ कारवार – केएसआर बेंगळुरू पंचगंगा एक्सप्रेसच्या वेळेतही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुब्रह्मण्य रोड, सालेकेश्र्वर आणि हसन या स्थानकांवरील वेळा बदलण्यात आल्या आहेत. कारवार येथून २५ ऑगस्ट २०२६ पासून प्रवास सुरू करणारी ही गाडी सुधारित वेळेनुसार धावणार आहे.
प्रवाशांनी कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची सविस्तर नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकर यांनी केले आहे. गाड्यांच्या थांब्यांची व वेळेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ ॲप डाऊनलोड करावे.


