दोडामार्गात ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने धुमाकूळ घातला असून, त्याला नियंत्रित करण्याऐवजी वनरक्षकाने अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
Follow us onदोडामार्ग तालुक्यात रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या वन्यप्राण्याला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका वनरक्षकाने अत्यंत बेजबाबदार आणि बेफिकीर भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.
गुरुवारी संध्याकाळी ‘ओंकार’ हत्ती मोरगाव-हाटीकडे जाणाऱ्या मार्गावर आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली, ज्यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी वनरक्षकांना हत्तीला सुरक्षितपणे जंगलात हाकलून लावण्यासाठी विनंती केली असता, संबंधित कर्मचाऱ्याने ‘हत्ती कोणाला मारतो तर मारू दे, गाडी फोडतो तर फोडू दे; आपल्याला काही फरक पडत नाही’ अशा प्रकारचे अत्यंत असंवेदनशील उद्गार काढले.
वनरक्षकाच्या या अरेरावी आणि निगरगट्ट वक्तव्यामुळे संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात संतापाची मोठी लाट उसळली असून, वनविभाग नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल किती उदासीन आहे, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तक्रार करायची असेल तर खुशाल करा, असे उद्धटपणे बोलून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.
सध्या या तालुक्यात सुमारे सहा हत्तींचा वावर असून तिळारी खोरे, कोलझर पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे आधीच अतोनात नुकसान होत आहे. त्यातच ‘ओंकार’ हत्तीने थेट मानवी वस्त्या, वाहने आणि नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे येथील एकूणच परिस्थिती अधिकच स्फोटक आणि गंभीर बनत चालली आहे.
यापूर्वी मंगळवारी रात्री कलोणे-फॉंडिये परिसरात ‘ओंकार’ने एका चारचाकी वाहनावर अचानक हल्ला करत सुले कारमध्ये घुसून मोठे नुकसान केले होते. या सलग घडणाऱ्या उपद्रवामुळे आणि वनविभागाच्या असहकार व बेजबाबदार भूमिकेमुळे परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालक आणि शेतकरी वर्गात पुन्हा एकदा तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.


