मुंबई: पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून नवीन उपनगरीय वेळापत्रक (क्रमांक ७९) लागू केले असून, एकूण १४१४ फेऱ्यांची संख्या कायम ठेवत गाड्यांचे व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि परिणामकारक करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी बोरिवली स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेची काही निवडक चर्चगेट-विरार लोकल बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी अवघ्या ६ मिनिटांच्या फरकाने दुसरी एसी लोकल उपलब्ध केली जाईल. विशेष म्हणजे, या गाड्यांचे दहिसरमधील थांबे कायम ठेवण्यात आले असून, दहिसर हे एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे यामुळे स्पष्ट होते.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार दररोजच्या एसी लोकल फेऱ्या १४५ वरून १४७ करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये १७:२८ ची चर्चगेट-बोरीवली आणि १८:२४ ची बोरीवली-चर्चगेट लोकल आता एसी स्वरूपात धावतील. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी दादर ते डहाणू रोड अशी थेट सेवा सुरू करण्यात आली असून, ती दादरहून १७:२२ वाजता सुटून १९:३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. तसेच, सकाळी विरारवरून सुटणारी ०८:२३ ची विरार-दादर लोकल आता थेट चर्चगेटपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे सकाळी चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी भाईंदर-विरार, बोरीवली-भाईंदर आणि बोरीवली-विरार या मार्गांवर नवीन रात्रीच्या फेऱ्या जोडण्यात आल्या आहेत.
कमी गर्दीच्या आणि विनावापर ठरणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करून त्याजागी प्रवाशांच्या खऱ्या गरजेनुसार नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या वैज्ञानिक आणि प्रवाशाभिमुख बदलांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे अधिक सुव्यवस्थित होऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेळेवर होण्यास मदत होईल.


