गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुल्यासाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.
वेंगुल्यातील प्रलंबित सीएनजी युनिट तातडीने सुरू करणे आणि दुर्गम भागांसाठी मिनीबसेस पुरवण्याबाबत बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
Follow us onमंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एसटी महामंडळाशी निगडित प्रलंबित प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सावंतवाडी, वेंगुल आणि दोडामार्ग तालुक्यातील एसटी सेवा व प्रवाशांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी सावंतवाडी एसटी आगाराच्या नवीन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, त्यात आवश्यक बदल करून पुढील चार दिवसांत सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गणेशोत्सव सणाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, या भागासाठी १५ नवीन बसेसची आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी लावून धरली होती. या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सणापूर्वी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुल्यासाठी प्रत्येकी ५ नव्या बसेस तातडीने उपलब्ध करण्याचे स्पष्ट आदेश दिले. सावंतवाडी मतदारसंघासाठी मंजूर असलेल्या ३० नवीन बसेसपैकी उर्वरित बसेसही टप्प्याटप्प्याने पुरवल्या जाणार असून यामुळे कोकणातील गणेशोत्सव प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागांतील रस्त्यांची दुरवस्था आणि अरुंद जागांमुळे नेहमीच्या मोठ्या बसेस चालवणे कठीण होते, ज्यामुळे अनेक मार्ग बंद पडले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून मिनीबसेस सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. वेंगुल्यामध्ये आयोजित आमसभेत उपसभापती सचिन देसाई यांनी हे लक्ष वेधले होते, ज्याची दखल घेत तिन्ही आगारांसाठी लवकरात लवकर मिनीबसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वेंगुर्ला एसटी आगारात सीएनजी युनिट मंजूर होऊनही ते अद्याप सुरू न झाल्याने एसटी बसेसना इंधन भरण्यासाठी ४ किलोमीटर अंतनावरील खाजगी पंपावर जावे लागत होते. या ये-जा आणि वाहतूक कोंडीमुळे एसटीचा वेळ, इंधन आणि मनुष्यबळाचा नाहक अपव्यय होत होता. ही बाब भाजपचे कमलेश गावडे व संजय गावडे यांनी मांडल्यानंतर, हे सीएनजी युनिट तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले, तसेच बंद पडलेल्या एसटी फेऱ्या पूर्ववत करण्याच्या सूचनाही दिल्या.
याशिवाय, एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी सध्या आरटीओ विभागात प्रतिनियुक्तीवर असल्याने महामंडळाच्या मूळ सेवांवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही चर्चेत आला. आरटीओ विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवून हे कर्मचारी पुन्हा एसटी महामंडळाकडे वर्ग केले जातील, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. या उच्चस्तरीय बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, मुख्य अभियंता दिनेश महाजन यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


