मुंबई ते कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ पुन्हा एकदा जलद ‘रो-रो’ जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात ही सुविधा उपलब्ध नसली तरी पुढील वर्षापर्यंत परवडणाऱ्या तिकीट दरांत मुंबई ते वेंगुर्ला (विजयदुर्ग आणि मालवण थांब्यांसह) ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
Follow us onगणेशोत्सव किंवा शिमग्यासारख्या मोठ्या सणांच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे ८ ते १० तासांच्या प्रवासासाठी तब्बल १४ तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. रेल्वे आणि एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या सोडूनही प्रवाशांची गर्दी आवरेनाशी होते. या प्रवासाचा मनस्ताप कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अतिजलद जलप्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हालचाली जलद गतीने सुरू केल्या आहेत.
यापूर्वी १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्गदरम्यान ‘एम टू एम प्रिन्सेस’ या ६२६ प्रवासी क्षमतेच्या बोटीद्वारे रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, विमान किंवा वंदे भारत रेल्वेपेक्षाही जास्त असलेले महागडे तिकीट दर (३ हजार ते ९ हजार रुपये) आणि महिन्यातच झालेला तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या १२ फेऱ्यांमध्ये ८९४ प्रवासी आणि १५४ वाहनांची वाहतूक झाल्यानंतर ही सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली होती.
यंदाच्या गणेशोत्सवात जरी या सेवेचा लाभ घेता येणार नसला, तरी पुढील गणेशोत्सवापर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रो-रो सेवा पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल. सागरी मंडळाने आता मुंबई ते वेंगुर्ला असा नवा मार्ग निश्चित केला असून यामध्ये विजयदुर्ग आणि मालवण हे महत्त्वाचे थांबे असतील. या सागरी मार्गामुळे मुंबईहून वेंगुर्ल्याला अवघ्या ७ ते ८ तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
वेंगुर्ला येथील जेट्टीचे काम सध्या वेगाने सुरू असून सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. ही सेवा चालवण्यासाठी चार प्रमुख कंपन्यांनी आपली उत्सुकता दर्शवली असून त्यांच्या प्रस्तावांवर विचार सुरू आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून योग्य कंपनीची निवड केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ही सेवा नियमित सुरू होण्यासाठी सुमारे एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेच्या व्यवहार्यतेची पाहणी सुरू आहे. मागील वेळचा अनुभव लक्षात घेता, यावेळी सर्वसामान्य प्रवाशांना परवडतील अशा रास्त तिकीट दरांचा विचार करून ही सेवा वर्षभर अखंडपणे चालवण्याचा सागरी मंडळाचा मानस आहे.


