सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; आठ शिक्षकांचा होणार गौरव

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी २०२६ च्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली.

​जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करण्यात आली असून त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्राने सन्मानित केले जाईल.

   Follow us on        

​शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२६ च्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ही घोषणा केली. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून शिक्षक दिनानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

​ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन परिपत्रकानुसार, जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्याची तरतूद यात आहे. या नियमानुसार जिल्हास्तरीय निवड समितीने प्राप्त झालेल्या अर्जांचे व प्रस्तावांचे यथोचित मूल्यांकन करून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची शिफारस केली होती.

​सन २०२६ च्या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून एकूण १९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये देवगडमधून २, दोडामार्ग ३, कणकवली २, कुडाळ ३, मालवण २, सावंतवाडी ३, वैभववाडी २ आणि वेंगुर्ला २ अशा प्रस्तावांचा समावेश होता. निवड समितीने छाननी व सखोल मूल्यांकन केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाचे नाव निश्चित करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवला होता. विभागीय आयुक्तांची अधिकृत मान्यता मिळताच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

​या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये कणकवली तालुक्यातून सुशांत सुभाष भमजी, सावंतवाडी तालुक्यातून निता नितीन सावंत, दोडामार्ग तालुक्यातून रमा भिवा गवस, वेंगुर्ला तालुक्यातून प्राजक्ता प्रशांत आपटे, कुडाळ तालुक्यातून अस्मिता अविनाश कुडाळकर, देवगड तालुक्यातून उत्तम नामदेव महिते, वैभववाडी तालुक्यातून दत्तात्रय शांताराम माईणकर आणि मालवण तालुक्यातून उन्नती बाळकृष्ण कराळे यांचा समावेश आहे.

​पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रु. ५०० चा जिल्हा पुरस्कार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच शासनाच्या सूचनेनुसार शिक्षक पती-पत्नींचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून व शैक्षणिक वर्तुळातून निवड झालेल्या सर्व शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search