गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज

गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मध्य व पश्चिम रेल्वेच्या मदतीने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर २४ तास वैद्यकीय सुविधा, मदत केंद्रे, तिकीट व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर करण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. या उत्सवाच्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत. यात उधना जंक्शन, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा जंक्शन, नागपूर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), वांद्रे टर्मिनस, दिवा, पनवेल ते चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव आणि ठोकूर या विविध स्थानकांदरम्यान विशेष गाड्यांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १२ सप्टेंबरपासून माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या समन्वयाने येथे निमवैद्यकीय कर्मचारी तैनात असतील. याशिवाय चिपळूण व रत्नागिरी स्थानकांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपत्कालीन मदतीसाठी उपस्थित राहतील. मुख्य स्थानकांवर मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, तसेच रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत.

प्रवाशांचा स्थानकांवरील वेळ सुरळीत जावा यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पूर्णवेळ उघडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी तिकीट खिडक्यांवर स्वतंत्र रांगा, पूर्वमुद्रित UTS तिकिटे आणि PRS काउंटर्सचा वापर केला जाईल. तसेच स्थानकांवर ‘एम-युटीएस’ सहाय्यक आणि २४ तास कार्यरत राहणारी ‘रेल यात्री सहायता केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. अतिगर्दीच्या वेळी प्रवाशांचे नियंत्रण करण्यासाठी निश्चित ‘होल्डिंग एरिया’ तयार केले जातील आणि पुढील प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बस सेवेशी समन्वय साधला जाईल.

सुरक्षेच्या दृष्टीने स्थानके व गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम कडक केली जाणार असून अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात केले जातील. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास सीसीटीव्ही यंत्रणा, पुरेसा सुरक्षा बंदोबस्त आणि रेल्वे सुरक्षा दलासह (RPF) स्थानिक पोलिसांचा समन्वय असणार आहे. याव्यतिरिक्त, स्थानकांवर नियमित सूचनांसोबतच गणपती उत्सवाच्या विशेष घोषणाही केल्या जातील.

स्थानकांवर उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पूजा साहित्य, सजावट, मोदक, काजू आणि स्थानिक वस्तूंचे स्टॉल्स लावले जातील. तसेच स्थानिक कलाकारांसाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून तिथे भजने, जाखडी, संगीत कार्यक्रम व कल्पक खेळांचे सादरीकरण होईल. स्थानकांची आकर्षक रोषणाई, सेल्फी पॉईंट्स, मोफत पाणी वाटप आणि लहान मुलांसाठी विशेष स्वागत उपक्रमही आयोजित केले आहेत. या सर्व सेवांचा लाभ घेताना प्रवाशांनी स्वच्छता व शिस्त पाळून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search