ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी कमी होणार

 

ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांवरून कमी करून शहरांप्रमाणेच २५ दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या सण-उत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील घरगुती गॅस ग्राहकांना भेडसावणारी अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांसाठी दोन रिफिल बुकिंगमधील ४५ दिवसांच्या बंधनकारक कालावधीची अट हटवण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांतील ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगचा कालावधी समान म्हणजे २५ दिवस करण्यात आला आहे.

​केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांत गॅस पुनर्भरण (रिफिल) करण्याची सुविधा होती, तर ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढचे बुकिंग करण्यासाठी ४५ दिवस वाट पाहावी लागत होती. एलपीजीच्या पुरवठ्याची सध्याची स्थिती सुधारली असून तुटवडा आणि प्रलंबित मागण्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा सकारात्मक बदल करण्यात आला आहे

भाजप कार्यकर्ते आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. 

गणेशोत्सवात पाहुण्यांची ये-जा, वाढता स्वयंपाक आणि घरगुती वापरामुळे ग्रामीण भागात गॅसची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळी ४५ दिवसांची मर्यादा अडथळा ठरत असल्याने दोडामार्ग भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळवणकर, देवा शेटकर, पराशर सावंत, अंकुश उर्फ भैया नाईक, सिद्धेश सांगम यांसह शिष्टमंडळाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे हा विषय मांडला होता.

​पालकमंत्री नितेश राणे यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाकडे या विषयाचा तातडीने व प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या या निवेदनाची आणि पाठपुराव्याची दखल घेत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांची अडचण दूर करत २५ दिवसांची नवीन मर्यादा लागू केली. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही प्रमुख तेल विपणन कंपन्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

​या नव्या नियमामुळे दोडामार्ग तालुका तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण एलपीजी ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या दिवसांत गॅस संपल्यास ४५ दिवस वाट पाहण्याचा मनस्ताप आता टळणार असून सर्वत्र या निर्णयाचे आणि या संदर्भात केलेल्या यशस्वी पाठपुराव्याचे मनापासून स्वागत केले जात आहे..

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search