मुंबई:
गणेशोत्सवाच्या तोंडावर मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावणारी गाडी क्रमांक १५०८७ / १५०८८ ‘सीएसएमटी – सावंतवाडी रोड – सीएसएमटी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने या नव्या रेल्वे सेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी मुंबई आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना थेट जोडणार असून यामुळे तब्बल ५०९ किलोमीटरचा प्रवास सुलभ होणार आहे.

वेळापत्रक आणि प्रवास वेळ
गाडी क्र. १५०८७ (CSMT ते सावंतवाडी रोड): ही गाडी मुंबई सीएसएमटीवरून दररोज रात्री २३:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १४:१५ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते CSMT): परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी रोडवरून दररोज सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे
या गाडीला दोन्ही मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
कोकणच्या विकासाला गती
या नियमित एक्स्प्रेसमुळे केवळ चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार नसून कोकणातील पर्यटन, स्थानिक उद्योग आणि व्यापारी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास या गाडीमुळे मदत होईल.


