मुंबई मेट्रोतून गणेशमूर्ती नेण्यास परवानगी! मात्र या आहेत अटी

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) मुंबई मेट्रो लाईन-३ (अ‍ॅक्वा लाईन) साठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मेट्रो प्रवासादरम्यान गणेशभक्तांनी सुरक्षेची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मेट्रो प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार, मेट्रोमधून वाहून नेल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या आकारावर मर्यादा घालण्यात आली आहे. मेट्रो गाड्या आणि स्टेशनवरील जागेचा विचार करता, मूर्तीची कमाल उंची पायापासून ते सर्वोच्च बिंदूपर्यंत १८ इंच (४५ सेमी) असणे बंधनकारक आहे. यापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींना मेट्रो प्रवासासाठी परवानगी दिली जाणार नाही.

सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो स्थानकांवर कडक तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांजवळ असलेल्या गणेशमूर्ती आणि त्या ठेवलेल्या पेटीची (कंटेनर) X-BIS यंत्राद्वारे स्कॅनिंग सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय स्थानकांवरील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या फ्रिस्कींग तपासणीला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मेट्रो प्रशासनाने ज्वलनशील किंवा स्फोटक द्रव्ये, धारदार आणि धोकादायक वस्तू, तसेच इतर प्रवाशांना बाधा निर्माण करू शकेल असे कोणतेही साहित्य सोबत नेण्यास सक्त मनाई केली आहे. प्रवासादरम्यान मेट्रोचे दरवाजे, आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि स्थानकातील मार्ग मोकळे ठेवावेत, जेणेकरून इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

गणेशमूर्ती वाहून नेण्याची संपूर्ण जबाबदारी प्रवाशांची स्वतःची असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानकांवर किंवा मेट्रो ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो कर्मचारी मूर्ती वाहून नेण्यावर तात्पुरते निर्बंध घालू शकतात. गणेशोत्सव सर्वांसाठी सुरक्षित आणि आनंददायी ठरावा, यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह मेट्रो प्रशासनाने केले आहे.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search