खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील १५ ते २० गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
मार्गात एसटी बस अडकल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत असून रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबी आणि ब्रेकरच्या साहाय्याने काम सुरू आहे.
Follow us onगुरुवारी ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात अचानक मोठी दरड कोसळली. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि अजस्र शिळा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असणारा संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
रघुवीर घाट हा या दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाचा प्रमुख आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. घाटमाथ्यावरील गावांतील नागरिक दैनिक गरजा, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि व्यापारासाठी नियमितपणे खेड शहरात येत असतात. परंतु, वाहतूक बंद पडल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन पार विस्कळीत झाले असून, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
या घटनेदरम्यान अकलपे-खेड ही एसटी बस गुरुवारी सकाळपासूनच दरड कोसळलेल्या ठिकाणी अडकून पडली आहे. बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी असल्यामुळे त्यांना तासनतास घाटातच ताटकळत राहावे लागले. रस्ता दोन्ही बाजूंनी बंद असल्याने ही बस पुढे नेणे किंवा मागे घेणे शक्य झालेले नाही. खेडच्या दिशेने विविध कामांसाठी निघालेले इतर प्रवासीही याच ठिकाणी अडकून पडले आहेत.
घटना घडल्यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदत पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेले दगड अत्यंत मोठे असल्याने केवळ जेसीबीच्या साहाय्याने ते हटवणे कठीण जात आहे. त्यामुळे या भल्या मोठ्या शिळांचे तुकडे करण्यासाठी ब्रेकर मशीनचा वापर केला जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
रस्ता पूर्ववत रहदारीसाठी कधी खुला होईल याची निश्चित वेळ अद्याप स्पष्ट झालेली नसून, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने केवळ मलबा हटवून न थांबता, धोकादायक ठिकाणांची पाहणी करून तेथे कायमस्वरूपी संरक्षक उपाययोजना करावी अशी रास्त मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जाशीर्षक


