मुंबई:
कोकणवासीयांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित दैनंदिन गाडी (गाडी क्र. १५०८७ / १५०८८) सुरू करण्याचा निर्णय मध्य व कोकण रेल्वेने घेतला आहे. या प्रवासासाठी आरक्षणाची (Reservation) तारीख व वेळ घोषित करण्यात आली आहे.
आरक्षण कधीपासून सुरू होणार? (Booking Details)
गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT): ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रवासासाठीचे तिकीट आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून सुरू होईल.
नियमित व पुढील सर्व फेऱ्यांसाठी म्हणजे १० सप्टेंबर २०२६ व त्यानंतरच्या सर्व प्रवासांसाठीचे बुकिंग ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजल्यापासून उघडेल.
हे आरक्षण सर्व PRS काउंटर, IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध असेल.
गाडीची वेळ व वेळापत्रक:
गाडी क्र. १५०८७ (मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड): ८ सप्टेंबर २०२६ पासून दररोज रात्री ११:५५ (२३:५५) वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० (१३:५०) वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
गाडी क्र. १५०८८ (सावंतवाडी रोड ते मुंबई CSMT): ९ सप्टेंबर २०२६ पासून दररोज संध्याकाळी ५:०० (१७:००) वाजता सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
(टीप: २१ ऑक्टोबर २०२६ पासून बिगर-पावसाळी (Non-Monsoon) वेळापत्रकानुसार ही गाडी सावंतवाडी येथे दुपारी २:१५ वाजता पोहोचेल आणि परतीची गाडी सायंकाळी ५:२० वाजता सुटेल.)
गाडीची रचना आणि थांबे:
या २३ डब्यांच्या एलएचबी (LHB) गाडीमध्ये फर्स्ट एसी (०१), टू-टायर एसी (०२), थ्री-टायर एसी (०३), ३ एसी इकॉनॉमी (०५), स्लीपर क्लास (०४) आणि जनरल अनरिझर्व्हड डबे (०४) असणार आहेत.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
गणेशोत्सव आणि ऐन सणासुदीच्या काळात या नियमित गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे सुलभ होणार आहे.


