मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर उभी केली जाणारी अवजड वाहने तातडीने हटवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
Follow us onगणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व विनाअडथळा व्हावा यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून दरवर्षी सणांच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाहने जात असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात महामार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जाते. मात्र, या बंदीच्या काळात इतर राज्यांत जाणारी किंवा परतीच्या प्रवासातील अवजड वाहने महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरच पार्क केली जातात. यामुळे गणेशभक्तांच्या वाहनांना पुढे जाण्यात मोठा अडथळा निर्माण होतो आणि सर्व्हिस रोडवरही मोठ्या रांगा लागतात.
या समस्येबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या तसेच हे सर्व्हिस रोडवरील ट्रक तातडीने हटवण्यात यावेत अशी आग्रही मागणी केली जात होती. प्रवाशांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने कारवाई करत उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे.
कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन जिल्हा वाहतूक शाखेने एक सविस्तर अहवाल तयार केला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले जात आहे.
शासनाला पाठवलेल्या या अहवालानुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक ११ सप्टेंबरच्या सकाळपासूनच पूर्णपणे बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे यंदाचा गणेशोत्सवातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे


