सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ शेजारील मोकळ्या जागेत इमारतीचे बांधकाम करण्याऐवजी भविष्यातील रेल्वे विस्तारासाठी लूप लाईन, अतिरिक्त प्लॅटफॉर्म व स्टेबलिंग लाईन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून स्टेशनमास्तरांना निवेदन दिले असून प्रस्तावित इमारतीच्या कामाला तत्काळ स्थगिती देण्याची भूमिका घेतली आहे.
Follow us onसावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या विकासांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक ३ लगत असलेल्या मोकळ्या जागेत प्रस्तावित असलेल्या इमारतीच्या बांधकामाला कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या जागेवर कोणतीही नवी इमारत उभारण्याऐवजी ती जागा भविष्यातील रेल्वे सेवांच्या विस्तारासाठी आरक्षित ठेवण्यात यावी, अशी स्पष्ट आणि ठाम मागणी संघटनेच्या वतीने लावून धरण्यात आली आहे.
आपला विरोध दर्शवण्यासाठी आणि प्रवाशांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रवासी संघटनेच्या वतीने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर व्यापक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अनेक प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, संकलित केलेल्या स्वाक्षऱ्यांसह एक सविस्तर मागणी निवेदन सावंतवाडीच्या स्टेशनमास्तरांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा ‘लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ म्हणून विकास करत असताना केवळ सिमेंट-काँक्रीटची इमारत उभारण्यावर भर न देता प्रत्यक्षात गाड्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर भर देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. यामध्ये गाड्यांचे स्टेबलिंग, देखभाल-दुरूस्ती, स्वच्छता, अतिरिक्त फलाट (प्लॅटफॉर्म) आणि लूप लाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
जर ट्रॅक किंवा रेल्वे लाईनसाठी उपयुक्त असलेल्या जागेवरच इमारतीचे बांधकाम केले गेले, तर टर्मिनस उभारणीचा मूळ उद्देशच निष्फळ ठरेल आणि भविष्यात स्थानकाचा विस्तार करण्याच्या मार्गात मोठा कायमस्वरूपी अडथळा निर्माण होईल, अशी भीती प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने या बांधकामाला तातडीने स्थगिती देऊन इमारतीसाठी अन्य पर्याय शोधावा.
तसेच कोकण रेल्वे प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रवासी संघटनांना विश्वासात घेऊन सावंतवाडी स्थानकाचा एक सुधारित आणि योग्य यार्ड आराखडा जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहीम आणि निवेदनानंतर सावंतवाडी टर्मिनसच्या नियोजनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता कोकण रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


