आंबोली: निसर्गरम्य आंबोली परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या नऊ मित्रांसह आंबोलीत पर्यटनासाठी आले होते.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा मित्रपरिवार महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, डॉ. आयुब हे लघुशंकेसाठी सुरक्षिततेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. यादरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. तिथे मका विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना खाली पडताना पाहताच सहकाऱ्यांना तातडीने याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदून आपल्या पथкаसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीच्या ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. परंतु, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ही बचाव मोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती.
बुधवारी सकाळी पहाटेपासून सावंतवाडी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमने पुन्हा एकदा वेगाने शोधमोहीम हाती घेतली. सकाळी दहाच्या सुमारास खोल दरीत डॉ. आयुब सय्यद यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. सध्या रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


