सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी तिलारी प्रकल्पावर आधारित ‘वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजना (टप्पा-२)’ आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणीपंप, बीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेच्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींसह सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नाबार्डच्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याने या योजनेचा प्रस्ताव वित्तपुरवठ्यासाठी शासनाकडे त्वरीत सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सागरी किनारपट्टीवरील वेंगुर्ला-चिपी परिसरात गोड्या पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असल्यामुळे या भागातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन उद्योगाची वाढ आणि नवीन व्यावसायिक प्रकल्पामुळे पाण्याची मागणी अधिक वाढणार असल्याने ही योजना अतिशय दूरदृष्टीची ठरणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.


