शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात जाण्याची संधी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी येथील कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ ची राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र व प्रगतशील शेतकऱ्यांनी २० ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक कार्य प्रत्यक्ष पाहण्याची आणि ज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दूधोत्पादन तर चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.

​निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान दिले जाईल. उरलेला ५० टक्के खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

​या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय २५ वर्षे पूर्ण असावे, तो मुख्य व्यवसाय शेती करणारा असावा आणि त्याच्याकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार सरकारी किंवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कॉन्ट्रॅक्टर नसावा आणि कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस याचा लाभ दिला जाईल.

​जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने वीडिओग्राफूसह सोडत काढून केली जाणार असून, यात किमान एक महिला शेतकरी आणि कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search