सिंधुदुर्ग: देवगड येथे अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हतर्फे कोकण आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ अधिवक्ता व माजी आमदार अजित गोगटे, अधिवक्ता परिषद प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे, अधिवक्ता राहुल तांबोलकर, अधिवक्ता स्वप्नील सावंत, अधिवक्ता अग्निवेश तावडे, अधिवक्ता प्रतिमा सातवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनातून मागणी करताना, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्याय प्रकरणांच्या सुनावणीसाठी पक्षकार, वकील आणि संबंधित नागरिकांना प्रत्येकवेळी मुंबईला जावे लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे कोकण आयुक्तांचे न्यायालय नियमितपणे भरविल्यास दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल आणि पक्षकार, वकील तसेच नागरिकांच्या प्रवासाचा खर्च, वेळ व श्रम यांची मोठी बचत होऊन न्यायप्रवेश सुलभ होईल.
या मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेऊन रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.


