ओला-उबरला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाची स्वस्त ‘छावा राइड’ सेवा सुरू होणार

   Follow us on        

मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ‘छावा राइड’ या नवीन ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मद्वारे बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यात दररोज सुमारे ६० लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या आणि १४ हजारहून अधिक बसचा ताफा असलेल्या महामंडळाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले ॲपचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.

​’छावा राइड’ हे केवळ कॅब बुकिंगचे ॲप नसून, ते एक राज्यस्तरीय मल्टि-मोडलिटी प्लॅटफॉर्म म्हणून विकसित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चालक नोंदणी, वाहन पडताळणी, भाडे निश्चिती आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा दिली जाईल. तसेच, प्रवाशांसाठी तक्रार निवारण यंत्रणा आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहणार आहे.

​या संपूर्ण यंत्रणेमध्ये चालक आणि वाहन ऑनबोर्डिंग, प्रशिक्षण, निकष, जीपीएस आधारित ट्रॅकिंग यांसारख्या गोष्टींवर विशेष भर दिला गेला आहे. महिला व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा, तसेच उत्तम ग्राहक सेवा केंद्र आणि तक्रार निवारण यंत्रणा यांचाही यामध्ये समावेश असणार आहे. नियामक नियमांचे योग्य पालन सुनिश्चित करण्यासाठी एक केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार असून, त्याद्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंग करून संपूर्ण सेवांवर बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे.

​तांत्रिक सादरीकरणाच्या टप्प्यात कंपन्यांना ॲपची कार्यपद्धती, तंत्रज्ञान, स्केलेबिलिटी, जोखीम व्यवस्थापन आणि प्रोटोटाइपचे प्रात्यक्षिक सादर करावे लागणार आहे. तांत्रिक मूल्यमापनामध्ये यशस्वी ठरणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील. या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक कंपन्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल, ज्यासाठी ५० लाखांची अनामत रक्कम आणि ५ लाख रुपये निविदा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

​ॲप-आधारित वाहतूक क्षेत्रातील खाजगी कंपन्यांची मक्दारे मोडीत काढून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘छावा राइड’ ॲप विकसित केले जात आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या माध्यमातून प्रवाशांकडून केवळ किमान पाच रुपयांचे प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाणार असून, कोणतीही अतिरिक्त प्रवासी भाडेवसुली केली जाणार नाही, तर सेवा पुरवणाऱ्या कंपनीला महसुलाच्या वाट्यातून  हिस्सा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search