घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत असून ही अट शिथिल करून पूर्ववत १५ ते २१ दिवसांवर आणावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे.
Follow us onसिंधुदुर्ग: ग्रामीण आणि शहरी भागांमधील अनेक कुटुंबांकडे केवळ एकच गॅस सिलिंडर उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत, घरगुती गॅस संपल्यानंतर पुढील बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने गृहिणींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या आगामी काळात श्रावण महिना आणि गणेशोत्सव सण जवळ येत असल्यामुळे घरात पाहुणचार, नैवेद्य तसेच विविध धार्मिक विधींचे प्रमाण वाढते. परिणामी, या सण-समारंभाच्या दिवसांमध्ये गॅसचा नियमित वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो.
नियोजित वेळेत गॅस उपलब्ध न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण लाकूड किंवा कोळशाचा पर्याय शोधावा लागतो. यामुळे विशेषतः महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक तसेच आर्थिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
ही सर्व गंभीर परिस्थिती लक्षात घेता, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतील यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द केले आहे. या निवेदनाद्वारे, ४५ दिवसांची ही जाचक अट तात्काळ कमी करून ती पूर्वीप्रमाणे १५ ते २१ दिवसांवर आणावी आणि नागरिकांना गरजेनुसार गॅस पुरवावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
तसेच या कालमर्यादेचा गैरफायदा घेऊन अतिरिक्त दर आकारणाऱ्या, काळाबाजार करणाऱ्या किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आक्रमक भूमिकाही या प्रसंगी मांडण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच बाळू सावंत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


