सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मासिक स्थायी समितीची बैठक नुकतीच आंबोली ग्रामपंचायत सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर, विविध समित्यांचे सभापती तसेच सर्व संबंधित खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सरकारी मराठी शाळांमधील खालावत चाललेल्या पटसंख्येवर आणि शिक्षकांच्या बेजबाबदारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अध्यापनाच्या वेळेस शिक्षक मुलांकडे लक्ष न देता सतत मोबाईलवर व्हॉट्सअॅपमध्ये मग्न राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार, अशी खंत त्यांनी मांडली.
या गंभीर तक्रारीची तत्काळ दखल घेत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शालेय वेळेत शिक्षकांकडून होणाऱ्या मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे कडक आदेश दिले व त्याबाबतचे परिपत्रक काढण्यास सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारची कसूर किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.
याशिवाय, वर्गातील कौशल्य प्रकरणांवरून निर्माण झालेल्या विषयावरही सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. याप्रकरणी संबंधितांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देऊन प्रशासकीय शिस्त अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले.
तसेच ग्रामीण भागातील अपुऱ्या एसटी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि गोव्याच्या बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘सिंधुदुर्ग कक्ष’ व अतिरिक्त अधिकारी नेमण्याची मागणी सदस्यांनी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.


