रेल्वे आरक्षणातील ‘व्हीआयपी’ तिकिटांचा घोटाळा उघड; ७ जणांना अटक

   Follow us on        

मुंबई: सण-उत्सवांच्या काळात लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही दलालांनी थेट राज्याच्या राज्यपाल कार्यालयाच्या (लोकभवन) नावाचा गैरवापर करून व्हीव्हीआयपी (VVIP) तिकिटे मिळवण्याचे मोठे रॅकेट चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी राज्यपाल कार्यालयाच्या नावाचे बनावट लेटरहेड, तसेच बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे ५०० हून अधिक दलालांच्या सिंडिकेटने व्हीव्हीआयपी इमर्जन्सी कोट्याच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मलबार हिल पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अंबरीश ठक्कर याच्यासह एकूण ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

राज्यात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘लोकभवन’च्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करून रेल्वेच्या डोळ्यात धूळफेकणारा अंबरीश ठक्कर अत्यंत हुशारीने हे काळे जाळे चालवत होता. त्याचे एजंट लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना गाठून त्यांचे पीएनआर (PNR) नंबर मिळवायचे आणि ते अंबरीशकडे पाठवायचे. त्यानंतर अंबरीश उच्चपदस्थांच्या नावाचे बनावट लेटरहेड, सही आणि शिक्के वापरून व्हीव्हीआयपी इमर्जन्सी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करून घेत असे. या काळ्या धंद्यातून आलेला पैसा तपास यंत्रणांच्या नजरेस येऊ नये, म्हणून तो ही रक्कम आपल्या पत्नीच्या आणि कपड्याच्या दुकानातील कामगारांच्या बँक खात्यावर वळवत होता.

​हे सिंडिकेट केवळ लोकभवनपुरते मर्यादित नव्हते, तर अंबरीशने रेल्वेतील उच्चपदस्थांच्या नावानेही बनावट लेटरहेड बनवून तिकिटांचा काळाबाजार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अंबरीश ठक्कर हा यापूर्वीही अशा गुन्ह्यांत सहभागी होता. एप्रिल २०२५ मध्ये पश्चिम रेल्वे आणि कुर्ला येथे तिकिटांचा काळाबाजार करताना रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले होते. मात्र, दोन्ही प्रकरणांत तो अटकपूर्व जामीन मिळवून बाहेर आला होता. यावेळी मात्र थेट राज्याच्या कार्यालयाच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

​राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर करून चालवल्या जाणाऱ्या या कोट्यवधी रुपयांच्या रॅकेटमध्ये पोलीस आता संपूर्ण पाळेमुळे खणून काढणार का? तसेच यात अंबरीश ठक्कर हाच मुख्य सूत्रधार आहे की यामागे आणखी मोठे मासे लपले आहेत, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search