सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडीत असलेल्या एका पडक्या घराच्या व्हरांड्यात अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळावर अचानक छापा टाकला, ज्यामध्ये काही तरुण गांजा विक्रीसाठी एकत्र जमल्याचे निदर्शनास आले.
छाप्यादरम्यान सुनील श्रीकांत मुदगल, विशाल वडर, अमर मारुती धेत्रे आणि चंद्रप्रकाश पलठण प्रजापती या चार संशयितांकडे गांजा आढळून आला. पोलिसांना पाहून यातील विशाल वडर याने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र इतर तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश कदम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहायक पोलीस निरीक्षक हिंगे, पीएसआय हडळ आणि एलसीबीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.


