पळस्पे-इंदापूर मार्गावरील टोलच्या रचनेमुळे कोकणवासीयांना मोठा फटका बसत आहे. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसतानाही खारपाडा टोल सुरू झाला आहे आणि आता सुकेळी येथील टोल नाकाही कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यामुळे प्रवास महाग होणार आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून रोजगारासह विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक आणि पर्यटकांना एकाच मार्गावर दोनदा टोल भरण्याची सक्ती अन्यायकारक वाटत आहे. गणेत्सोव आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी कोंडी आणि आता त्यात वाढलेला टोलचा खर्च, यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. टोल नाक्यांमधील किमान अंतर ६० किलोमीटर असावे, हा नियम डावलून उभारलेले हे दोन्ही टोल नाके जनहिताच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करत, त्यातील किमान एक टोल नाका तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी रेटली आहे.
अजूनही अनेक ठिकाणी महामार्गाचे चौपदरीकरण अपूर्ण आहे, सुविधांचा अभाव आहे आणि त्यातच दुहेरी टोलचा आर्थिक मार, अशा परिस्थितीत या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे. कोकणवासीयांसाठी हा अत्यंत संवेदनशील विषय बनला असून, आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


