सावंतवाडी : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व त्यांच्या उपस्थितीत तिलारी प्रकल्पावरून आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा – २ पाणीपुरवठा योजना व तिलारी पाणीपुरवठा योजना ही सौर उर्जवेर कार्यान्वित करण्यासह टप्पा -१ या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा समावेश यात करण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.
या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार योजनेचे प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने आज पाणीपुरवठा मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आम. दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प सिंधुदुर्ग, मुख्य अभियंता,जीवन प्राधिकरण ठाणे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल, सहायक महाप्रबंधक, नाबार्ड पुणे, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,सिंधुदुर्ग व इतर अधिकारी उपस्थित होते.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष सर्वक्षण करून येत्या पंधरा दिवसात नाबार्ड योजने अंतर्गत मंजुरीसाठी शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ब्राह्मणपाट,कुंभाली सोनुर्ली व न्हावेली इत्यादी व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित योजनांबाबत सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. या गावांना व सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा समावेश वेंगुर्ला ते चिपी टप्पा २ अंतर्गत समावेश करून येत्या १५ दिवसात तसा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या योजनेमुळे या भागातील विविध उद्योगधंदे, हॉटेल व्यवसायिक पर्यटन व्यावसायिक यांना पाण्याची पुरेशी सोय होणार आहे. पर्यटनाला चालना मिळणार असून भविष्यात चिपी विमानतळ चा विस्ताराचा अनुषंगाने फायदा होणार आहे. तसेच मार्च ते मे मध्ये किनारपट्टी भागातील गावांना पाण्याची फार मोठ्या प्रमाणात कमतरता असते. या योजनेमुळे त्या गावाचीही पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. तसेच या योजनेमुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार आहे.


