सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्हा आणि शेजारील गोवा या दोन्ही प्रमुख पर्यटन क्षेत्रांमधील दळणवळण अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेटीवरून थेट गोव्यापर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास दोन्ही राज्यांमधील पर्यटनाला नवी गती मिळण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने बुधवारी मंत्रालयात ‘कॉन्टिनेंटल इंटरलँक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘गोवा (जॉईज) कार रेंटल’ या कंपन्यांचे विशेष सादरीकरण (प्रेझेंटेशन) झाले. यावेळी सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्याच्या विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, चिपी विमानतळाचे मुख्य संचालक कुलदीप सिंग, कॉन्टिनेंटल इंटरलँकचे विकास राजपूत व सतीश येरूनकर तसेच गोवा कार रेंटलचे नाथन वेगास यांच्यासह बंदरे विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Important: दिलेला फोटो केवळ नमुन्यासाठी असून, भविष्यातील योजनेची ढोबळ कल्पना देणारा आहे


