रत्नागिरी : प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने नव्याने बस घेण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या गाड्यांचे प्रदूषण होत असल्यामुळे नव्याने बीएस ६ प्रणालीच्या बस आणण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात बीएस ६ च्या नव्या कोऱ्या २१ आरायमदायी लाल बस दाखल झाल्या आहेत. एकूण ५० गाड्या रत्नागिरी विभागासाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित गाड्या लवकरच येणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
बसमध्ये दर्जेदार सुविधा
नव्याने दाखल झालेल्या गाड्यांमुळे एसटी विभागाकडे पुन्हा प्रवासी आकर्षित होण्याची आशा व्यक्त होत आहे. या बसमध्ये दर्जेदार सुविधा असणार आहेत. ४४ आसनांची आणि दोन बाय दोन आसन रचना, स्वयंचलित दरवाजा, पुढच्या मागच्या बाजूला डिजिटल मार्गदर्शक फलक, मोबाईल चार्जिंग, मागे आपत्कालीन दरवाजा अशा सुविधा असणार आहेत.
देखभालीसाठी खासगी कंत्राटदार
रत्नागिरी विभागाला देण्यात आलेल्या या सर्व बस कंत्राटी पद्धतीने चालणार आहेत.बसचा देखभाल खर्च खासगी कंत्राटदार करणार आहे. त्या बदल्यात एस. टी विभागाकडून काही रक्कम देण्याचा करार करण्यात आला आहे.
रत्नागिरी – रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाच्या साठ्यांचा (Oil Reserves) शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असून यासंदर्भातील कामही सुरु झालं आहे. स्थानिक मच्छीमारांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्राद्वारे सावधानतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून 40 नॉटिकल मैलांवर ओएनजीसी कंपनीमार्फत तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्वेक्षण (सिझमिक सर्व्हे) करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणासाठी एक मोठे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जयगड ते रायगड दरम्यानच्या समुद्रामध्ये फिरणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना दुर्घटना टाळण्यासाठी मच्छीमारांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षा बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून केले आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना पाठवण्यात आले आहे.
हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा तसेच अक्षांश व रेखांशची माहितीही मच्छीमारांना कळवण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून 40 नॉटिकल मैलांवर दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण क्षेत्र किनाऱ्यापासून लांब असून, दाभोळपासून खोल समुद्रात 75 किमी अंतरावर आहे.
जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे जहाज 4 ते 4.5 नॉट्स वेगाने 24 तास सतत समुद्रात सक्रीय राहणार आहे. या जहाजाच्या मागे 6 हजार मीटर लांबीच्या (6 किलोमीटर) 10 केबल्स लावण्यात आल्या आहेत. स्ट्रीमर्सची खोली 6 मीटर आणि शेपटीच्या दिशेने 30 मीटरपर्यंत असेल. हा भाग पाण्याखाली असेल असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक 6 हजार मीटर लांबीच्या केबलच्या शेवटी फ्लॅशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट न थांबता चालवण्यात येणार असून, ती लगेच वळवता येत नाही. अपघात टाळण्यासाठी मच्छीमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
या मोठ्या जहाजाबरोबर दुसरे एक छोटे जहाज (सॅन्को स्काय) आणि 3 सुरक्षा व्हेसल्स (मॅट युरेनस, एनाक्षी, सोहा) या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करत असताना समुद्रात मासेमारी नौकांच्या हालचालींचं प्रत्येकी दोन समन्वयक आणि दुभाष्यांद्वारे 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मासेमारीसाठी जात असताना मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा सर्व्हे जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा तसेच स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे.
ओएनजीसी कंपनीकडून समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी जहाज दाखल होत आहे. सर्वेक्षण करत असताना मच्छीमारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मच्छीमार सोसायटींना पत्र पाठवण्यात आले आहे, असं सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी म्हटलं आहे.
चिपळूण:मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम चालू असल्याने या भागात रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथून जात असताना आपले वाहन सावकाश चालवण्यात यावे.
आज सकाळी या भागात काम चालू असताना रस्त्यावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने अनर्थ घडला नाही. कंत्राटदार कंपनीने जेसीबी च्या सहाय्याने ही दरड बाजूला करून वाहतुक पूर्वस्थितीत आणून दिली होती. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने या मार्गावरून जाणार्या प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागे दोन वेळा रस्त्यावर भले मोठे दगड पेढे वस्तीत आणि रस्त्यावर आले होते. सुदैवाने अजूनपर्यंत काही जिवितहानी झाली नाही आहे. पण या सर्व प्रकारांतून कंत्राटदार कंपनी कामांदरम्यान योग्य त्या सुरक्षिततेचे मापदंड पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.
त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
स्थानकात लिफ्ट सुरू करणे
जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Mumbai Goa Highway News:जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातिवली येथील टोलनाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिले आहेत. तसेच ह्या टोल नाक्यापासूनच्या १२ किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल असे पण त्यांनी जाहीर केले आहे.
मागे ह्या टोलनाक्यावर टोलवसुली चालू झाली होती. ह्या वसुलीस स्थानिक ग्रामस्थानकडून मोठा विरोध झाला होता, स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मिळून ह्याविरोधातआंदोलन केले होते, त्यामुळे हि टोलवसुली थांबवली होती. आता पुन्हा ही टोलवसुली चालू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू केलेली ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप: प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.
रत्नागिरी: रत्नागिरीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन जानेवारीअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटींचा निधीही शासनाकडून मिळाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. जमिनिचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी :खेड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.
यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘रत्नागिरी दर्शन‘ हि बस फेरी चालविण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर ते ०१ जानेवारी दरम्यान दररोज हि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
आडिवरे,कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा आणि गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरी स्थानकावर हा प्रवास संपवला जाणार आहे.
रत्नागिरी :आज मुख्यमंत्री एकनाथ यांचा रत्नागिरी दौरा होता. ह्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती.
मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्ता करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश.
MMRDA प्रमाणेच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार
मत्स्य व्यवसायातून परकीय चलन उपलब्ध होण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेणार.
पर्यटन वाढीसाठी ‘बांधा आणि वापरा’ तत्वावर सेवा सुविधा पुरवल्या जातील.
कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत निर्णय घेतले जातील.