Category Archives: रत्नागिरी

श्री क्षेत्र टेरव येथे चैत्र पौर्णिमेला भाविकांच्या अलोट गर्दीत वार्षिक जत्रोत्सव जल्लोषात संपन्न.

   Follow us on        

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव गावातील पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी  देवी आहे. श्री कालकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे.

रामवरदायिनी मंदिर मजरे दादर येथे दसपटकर शिंदे कदम मोकाशी यांची एकच जत्रा होत असे. परंतु अंदाजे एका शतकापासून रामवरदायिनी मंदिर दादर आणि श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव अशा दोन वेगवेगळ्या जत्रांचे आयोजन चैत्रपौर्णिमेस केले जाते. या जत्रेविषयी एक दंतकथा आहे, एक वेळ कदम मोकाशी टेरकर यांच्या काही मनाबद्दल थोडी चूक झाली होती. त्यामुळे त्याच रात्री श्री रामवरदायिनी मंदिर दादर येथून निघून टेरवकरांनी आपल्या टेरव गावी जत्रा भरविली. एकमेकांची समजूत घालण्यात आली व पूर्वीप्रमाणे एकोप्याने वागू लागले, परंतु देवीचे कार्य सुरू केल्यामुळे ते चालू ठेवावे लागले, यावरून दसपटकरांचे एकमेकांवरचे प्रेम व सौख्य दिसून येते.

शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या संकटमोचक महाबली श्री हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक १२ एप्रिल  रोजी चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सुर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकऱ्यानी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी  मातेसमोर ठेवून  गाऱ्हाणे (आर्जव) घालून  पुजाऱ्यानी ते श्रीफळ वाढवून  प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप केले. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे-मागणे  देवून उपस्थित ग्रामस्थ,  भाविकांना  पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या – मागण्याचा  प्रसाद वाटप करण्यात आला.  रुढी परंपरेनुसार सर्व पुजाविधी पार पडल्यावर पालखीमध्ये  कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपी लावण्यात आली.

शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा  श्री क्षेत्र टेरव गावचा चैत्रपोर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस होय. माहेरवाशिणी, सगे सोयरे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकानी या जत्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य ग्रामस्थांप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, सुरत इ. शहरात स्थायिक झालेले टेरकर आपल्या मायभूमीला विसरलेले नाहीत, ही  गावासाठी जमेची बाजू होय.

जत्रेनिमित्त घराघरात उल्हासाचे व आनंदाचे वातावरण होते. अंगणात, रस्त्यावर, पाय वाटेवर रांगोळ्या घालून विद्युतरोषणाईची आरास  करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या आवारात कुरमुऱ्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, मिठाई, सरबत, आईस्क्रीम, कलिंगड इ. तसेच पिपाणी, भिंगरी, भिरभिरे, मोटार, बॅट-बॉल अशी नाना तर्‍हेची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच या वर्षी  बाल गोपालांसाठी  जंपिंग झपाक, मिकी माऊस, रिंग गेम या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.

संध्यकाळी ५ वाजता देवीना परिधान केलेल्या साड्या व पालखीस अर्पण केलेल्या पासोड्यांचा (वस्त्रांचा) रंगमंचावर लिलाव करण्यात आला.

चैत्र पौर्णिमा जत्रेस मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्वरुप यावे आणि जत्रेची शोभा वाढावी यासाठी पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्या वाजतगाजत मिरवणुकीने टेरव येथे रात्रौ १० वाजता पोहचल्या होत्या. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी  सजविण्यात आल्या होत्या. रूढी परंपरे प्रमाणे  चिंचघरीची पालखी श्री शिवराम गुरव यांच्या अंगणात  तर कामथे गावची पालखी श्री संतोष म्हालीम यांच्याअंगणात थांबली होती. कामथेच्या पालखीचे स्वागत  टेरवच्या   पालखीने  भारतीवाडीच्या होळीवर  करून तेथून या दोन्ही पालख्या श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळ  चिंचघरीच्या पालखीस भेटल्या. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळून मंदिराकडे मार्गस्थ झाली. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटवितानाचे दृश्य विलोभनीय, मनमोहक व नयनरम्य होते, ते पाहून असंख्य भाविक आनंदाने बेभान झाले व तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. या तीन पालख्यांची भेट पाहून मन अगदी भरुन आले होते. पालख्यांची भेट झाल्यावर प्रथम कामथे नंतर चिंचघरी व शेवटी टेरवची पालखी  छबेना काढून मंदिरात स्थानापन्न झाली. मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. कोकणातील प्रति तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवीच्या दर्शनासाठी तसेच वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्यासाठी भाविकांचा महापूर श्री क्षेत्र टेरव येथे लोटला होता. या वार्षिक जत्रोत्सवास चैत्रावली  असेही संबोधले जाते. ग्रामदेवतांच्या पालख्या, करमणुकीची साधने, खाद्य व प्रसादाची दुकाने,  आणि विविध खेळांचे प्रदर्शन ही या जत्रेची विशेषता होय.

तिन्ही पालख्या मंदिरात स्थानापन्न झाल्यावर रात्रौ  कोल्हापुर येथील एका पेक्षा एक अप्सरा ह्या मराठी लोकधरेने सजलेल्या आणि महाराष्ट्राच्या लावणीने बहरलेला मराठी व  हिंदी गीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ झाल्या, त्यावेळी  श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेण्यात आली आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवा दिनी वार्षिक जत्रोत्सव उत्साहात व आनंदाने संपन्न झाला.

 

श्री क्षेत्र टेरव येथे शिमगोत्सव जल्लोषात आणि उत्साहात संपन्न.

   Follow us on        

रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.

१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.

होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.

रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.

२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.

प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.

 

घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.

 

सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

राखले पावित्र्याचे भान!

वाढविले संस्कृतीची शान!!

ठेवले उत्सवांचे भान!

केला देवतांचा सन्मान!!

आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.

संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.

सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.

Mandangad: तब्बल २७५ माकडे पकडून सोडली नैसर्गिक अधिवासात!

No block ID is set

मंडणगड: शहरातील नागरिक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाच्यावतीने 28 फेब्रुवारीपासून तालुक्यात वनविभागाच्यावतीने माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 275 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात कार्यवाही करण्यात आली.

उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक प्रियांका लगड, दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात आठ दिवस राबवण्यात येणार आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणी शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येत आहे. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येते. मंगळवारी शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पकडण्यात आली. वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल ब्रिहाडे, समाधान गिरी व सहकारी पाटील यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. यावेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील सोवेली, वेळास, बाणकोट, वेसवी, उमरोली, शिपोळे गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

चिपळूण: कुंभार्ली घाटात कारला अपघात होऊन दोघांचा मृत्यू; मोबाईल लोकेशनमुळे दोन दिवसांनी प्रकार उघडकीस

   Follow us on        

चिपळूण : पुणे येथून चिपळूणला येत असताना कुंभार्ली घाटातील काळकडा येथील अवघड वळणावरून कार 500 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्री घडली. मात्र मंगळवारी दुपारी मोबाईल लोकेशनमुळे हा अपघात उघडकीस आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की विश्वजित जगदीश खेडेकर (40) आपल्या मातोश्री सुरेखा जगदीश खेडेकर (70) आणि आपल्या पत्नी समवेत रविवारी चिपळूणला काही कामानिम्मीत निघाले. वाटेत विश्वजितने आपल्या पत्नीला सातारा येथे माहेरी सोडून तो आईला घेऊन चिपळूणकडे निघाला. वाटेत रात्री पाटणजवळ जेवणही केले. विश्वजितच्या पत्नीने या दोघांनाही वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजितचा मोबाईल बंद होता, तर सासू सुरेखा यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. शेवटी त्यांच्या पत्नीने जिथे ते जाणार होते तेथे फोन करून विचारणा केली. मात्र तिकडे कुणी पोहोचले नसल्याचे समजले.

वाटेत काही तरी विपरीत घडले असावे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी पोलिसांची मदत मागितली. पोलिसानी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले असता ते कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलीस, ग्रामस्थांसमवेत घाटात येऊ पाहणी सुरू केली. याचवेळी काळाकडा येथून कार घसरत गेल्याचे दिसून आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 500 फूट दरीत कार सापडली. त्यामध्ये दोघेही मृतावस्थेत आढळले. रात्री क्रेनच्या माध्यमातून दोन्ही मृतदेहांसह कार दरीतून बाहेर काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शिरसोली येथे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन

सन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने शिरसोली येथील नदीच्या किनारी असलेल्या स्वयंभू शंभो महादेवाच्या मंदिर क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 

   Follow us on        

दापोली: दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवार दिनांक. २६.२.२०२५ रोजी संप्पन्न होत असून भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्वयंभू शंभू महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील निसर्गरम्य परीसरात शिरसोली येथे नदीच्या किनारी हे स्वयंभू शंभो महादेवांचे मंदिर आहे. येथे १९७४ मध्ये सतत ३ वर्ष महादेवांच्या दर्शनासाठी गंगामाता अवतरली होती. त्या वेळी दूर दूर वरून भाविक या पवित्र स्थानाला भेट देत असत.

गेली २४ वर्ष अविरत शिवपार्वती दिंडी मंडळामार्फत अनेक शिवभक्त मुंबई ते शिरसोली पायीवारी करतात. यावर्षी दिनांक २२-०२-२५ पासून शिवपार्वती दिंडी मंडळाने मुंबई ते शिरसोली पायी वारीचे आयोजन केले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूच्या दर्शनासाठी भाविकांचा सकाळपासूनच ओघ सुरू असतो. मुंबईवरून निघालेल्या दिंडीवारीचे सकाळी १०.३० वाजता स्वागत करून देऊळवाडी येथील ग्रामदेवतेची गादी असलेल्या घरातून देवाच्या वारीची सुरुवात केली जाते. ही देववारी आणि मुंबईतून आलेली वारी एकत्रीतरित्या मोठ्या भक्तीभावाने ग्राम दैवत आसलेल्या भैरी भवानीच्या मंदिरात जाते व तिथून गावच्या मध्यभागातून भक्तीमय वातावरणात शिवशंभूच्या मंदिरात पोहोचते. शिवमंदिरात पोहचताच *हर हर महादेव* या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दिंडी सोबत आलेल्या भाविकांसह सर्व भाविक शिवशंभुचे दर्शन घेतात. शिवशंभूचा आशीर्वाद मिळाल्याने प्रसन्न मुद्रेने सर्व भाविक आनंदाने मंदिराबाहेर पडतात .

मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच शिवशंभूचा तीर्थप्रसाद सर्वांना दिला जातो. तसेच आलेल्या सर्व भाविकांना मंडळामार्फत फराळी चिवडा व कोकम सरबत दिले जाते.

दिनांक २६/२/२५ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू शंभू महादेवांच्या मूर्तीवर सकाळच्या नित्य पूजेनंतर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात येतो.

महादेवाचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर साधारणता १२.३० च्या दरम्यान मंदिरासमोरील टेकडीवर गोसावी मठामध्ये गोसावी देवांचे पूजन केले जाते तेथेही सर्व भाविक गोसावी देवांचे दर्शन घेतात.

गोसावी मठातून पूजन करून आल्यानंतर साधारण १.३०च्या दरम्यान शंभो महादेवांची महाआरती करण्यात येते. त्यानंतर दिवसभर मंदिराच्या सभामंडपात स्थानिक भजन मंडळ देवाचे नामस्मरण करत असतात. दिवसभर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो.

रात्रौ ८ नंतर मंदिरात रात्रभर वारकरी संप्रदायाच्या नामांकित दिंड्या येऊन हरिनाम करत महाशिवरात्रीचा जागर सुरू होतो. कोकणातील विशेष वाद्य आसलेल्या खालु बाज्याने प्रत्येक दिंडीचे स्वागत करुन हरिनामाला सुरुवात केली जाते.

या उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या परिसरात एक दिवसाची बाजारपेठ स्थापून विविध दुकानदार आपल्या मालाची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत उत्सवाची शोभा वाढवतात.

दिनांक २७/२/२५ रोजीच्या पहाटे होणाऱ्या काकड आरती मध्ये सर्व महिला पुरुष, वारकरी बेभान होऊन वारकरी ठेक्यावर तल्लीन होतात.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २७/२/२५ सकाळी येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिराच्या सभामंडपात महाप्रसाद वाढून या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता होते.

दापोली तालुक्यातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो भाविक या उत्सवास येतात. तालुक्यातील एक मोठा शिस्तबद्ध, नियोजित उत्सव म्हणून या महाशिवरात्र उत्सवाकडे पहिले जाते. हा उत्सव जास्तीतजास्त कसा उत्तम होईल यासाठी शिवशंभोचे भक्त, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भक्त गण हे सर्व जवळ जवळ 2 महिन्यापासून तयारीत असतात. अतिशय उत्साहात, जल्लोषात, भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव साजरा होतो. हजारो भक्तगण या उत्सवाला प्रचंड गर्दी करताना दिसून येतात. सर्व भक्तांच उत्तम सहकार्य व महाप्रसादासाठी अर्थिक मदत या उत्सवाला मिळते, सर्व भक्तगणांनी यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती महाशिवरात्र उत्सव मंडळ शिरसोली (मुंबई/स्थानिक) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

 

चिपळूण: टेरवचे सुधाकर कदम क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात सन्मानित

   Follow us on        

चिपळूण: क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७ वे राज्यस्तरीय कुलसंमेलन नुकतेच जामगे, खेड येथे संपन्न झाले. सदर प्रसंगी मा. ना. योगेशदादा कदम, गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन विभाग राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते व मा. बाबुराव कदम कोहळीकर आमदार हदगाव नांदेड, मा. आमदार अनिल कदम, निफाड, मा. महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, उद्योजग गजानन कदम प्रा. डॉ. सतीश कदम अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मा. सुनील कदम शस्त्र संग्राहक, मा. रामजी कदम सचिव, व मा. अमरराजे कदम अध्यक्ष क्षत्रिय मराठा कदम परिवार (महाराष्ट्र राज्य) व अध्यक्ष श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ, तुळजापूर या व इतर मान्यवरांच्या उपस्थित दसपटी विभागातील चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र व सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक सुधाकर कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पोपाट कदम लिखीत कदम कुळाचा इतिहास हे पुस्तक तसेच श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेचे कुंकू, प्रसाद व कवड्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

तसेच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव, चिपळूण देवस्थानची दिनदर्शिका व टेबल दिनदर्शिका देवून मंदिरास भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. सदर संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात व गोवा येथून हजारो क्षत्रिय मराठा कदम बांधव उपस्थित होते.

रत्नागिरी: कातळशिल्पांकडे लोकांचा कल वाढवा यासाठी अनोखा उपक्रम

   Follow us on        

रत्नागिरी:कोकणातील कातळशिल्पांकडे लोकांचा कल आणखी वाढावा, त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, या निमित्ताने या अश्मयुगीन कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण रत्नागिरीतील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र येथे करण्यात आले. कातळशिल्प संशोधक धनंजय मराठे यांच्या मागणीनुसार माजी मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून आणि अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने आणि वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी या कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण केले गेले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे , युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, दक्षिण तालुका अध्यक्ष दादा दळी, उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर अध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, निलेश आखाडे, उमेश देसाई आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी: जि. प. शाळा टेरव क्रमांक १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण

सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम

   Follow us on        

चिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.

तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.

चिपळूण: तिसर्‍या लुप लाइनच्या कामासाठी कोकण रेल्वेचा उद्या ब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

   Follow us on        

Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्‍या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.

दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेरव रत्नागिरीचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम यांचा प्रशंसापत्र देवून गौरव

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांनी अथक परिश्रम, कौशल्य, सातत्य व चिकाटीने सिने अभिनेते सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या बांगला देशी नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करणाऱ्या पथकामध्ये सहभागी होऊन ३५० सरकारी व खाजगी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक कौशल्याचा वापर व दिवस रात्र तपास करून आरोपीस शिताफीने अटक केले.

सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय सत्यनारायण चौधरी पोलिस सह. आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी प्रशंसापत्र देवून महेश कदम यांचं गौरव केला आहे. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दसपटी क्रीडा मंडळ मुंबई, रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट मजरे दादर, समस्त ग्रामस्थ टेरव यांनी व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कुलस्वामीनी श्री भवानी व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने उत्तरोत्तर महेशराव यांची अशीच प्रगती होत राहो अशी सदीच्छा टेरव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search