Category Archives: रत्नागिरी

‘देवखेळ’ वेबसीरिजमध्ये ‘शंकासुर’चा अपमान; बंदी घालण्यासाठी अ‍ॅड. आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

   Follow us on        

मुंबई: झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबसीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या वेबसीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘नमन-खेळे’ या प्राचीन लोककलेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले असून, या कलेतील प्रमुख पात्र असलेल्या ‘शंकासूर’ या देवतेचा अवमान केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

​कोकणातील ‘नमन-खेळे’ ही केवळ एक लोककला नसून ती सामाजिक आणि धार्मिक महत्त्व असलेली एक प्राचीन हिंदू परंपरा आहे. या कलेचा थेट संबंध ग्रामदैवतांशी असल्याने तिला विशेष पावित्र्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत या कलेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि दरवर्षी शासकीय महोत्सवांचेही आयोजन केले जाते. मात्र, ‘देवखेळ’ वेबसीरिजमुळे या लोकपरंपरेला धक्का लागल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. कोकणातील कलावंतांच्या विविध संघटनांनी या सीरिजला तीव्र विरोध दर्शवत शासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

​सध्या कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असून ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान खेड येथे शासकीय नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या या काळात अशा वादग्रस्त चित्रणामुळे सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावना लक्षात घेऊन शासनाने यावर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

‘देवखेळ’ वेब सीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः “शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो”, “होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे”, अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.

आजही जिवंत आहे माणुसकी! हरवलेले पाकीट प्रामाणिक हातांनी परत

   Follow us on        

संदेश सुरेश जिमन: या काळात स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक छोटीशी घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारी ठरली आहे.

अंत्रवली मालपवाडी गावातील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात केवळ पैसे नव्हते, तर त्यांच्या ओळखीचा आधार असलेली लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच चिंता, अस्वस्थता आणि भीती स्वाभाविकच होती.

मात्र हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले आणि इथूनच माणुसकीचा खरा चेहरा समोर आला. कोणताही लोभ न धरता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी प्रामाणिकपणाने ते पाकीट मूळ मालक नितेश मालप यांना शोधून काढून सुरक्षितपणे परत केले.

आज जिथे अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशा मावळते, तिथे सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजाला प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा दीप उजळून दाखवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

कसबा पंचायत समिती गणात संदेश जिमन यांच्या प्रचाराचा झंझावात; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.

कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जनसेवेचा ‘संदेश’ आता राजकारणात; रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे जिमन राजकीय आखाड्यात!

कसबा संगमेश्वर पंचायत समिती गणातून आपला “अपक्ष” उमेदवारी अर्ज दाखल केला!

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/सायले:

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम ठरवलेल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांपूर्वी आपले मतप्रदर्शन करणारे संदेश जिमन यांनी जनसेवा दृष्टीपथात ठेवून हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. आजवर कोणत्याही प्रसिद्धीसाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी आपण रेल्वे संबंधित कामे केली नाहीत.तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले.

याच प्रयत्नातून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती, जामनगर, पोरबंदर, मडगाव या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. रेल्वे प्रवास आता पहिल्या पेक्षा कितीतरी पटीने आरामदायी झाला आहे.

हे काम करीत असताना वेळोवेळी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत होत्या.

त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींशी जवळून संपर्कात आलो असे त्यांनी म्हटले. माझी जन सेवेची तळमळ बघून सगळेच भारावून गेले असल्याचे त्यांनी म्हटले पण जेव्हा भक्कम आधारावर जनसामान्यांच्या सेवा सुविधांसाठी झटायचा विचार मनात आला.

निष्ठावंत,जवळचे, स्नेह संबंधित व्यक्तींचा लळा मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अडसर ठरला आणि म्हणून हा अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पंचायत समिती गणातील दुर्गम भागातील गावांचा विचार आपण प्रामुख्याने करणार!

आजवर गृहीत धरलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आजही या भागातील जनतेला,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास, जनसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि हेळसांड,उपेक्षेचे दाखले देणारे रस्ते, जनतेच्या सुविधांसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणार! जनतेच्या खऱ्या गरजा ओळखून त्यांना परिपूर्ण करण्यासाठी वेळ देणार! असे वक्तव्य पोटतिडकीने संदेश जिमन यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजांचा श्वास खेळला, शौर्याचा लाव्हा उसळला त्या छत्रपतींचे कसबा संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय स्मारक झाले आणि धन्य झालो एवढ्यावर न थांबता पर्यटन आणि स्थानिकांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कसबा गणातील महिला, पुरुष, गरजू व्यक्ती, दिव्यांग , यांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील रहाणार असल्याचे म्हटले.

एकंदरीत एक युवा, सुशिक्षित, समाजसेवेची नाळ जाणणारा व्यक्ती या राजकीय परिघात प्रवेश करतो आहे. सद्यस्थितीत राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध जवळजवळ नावालाही नसावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्लानीत असलेल्या मतदार बंधू भगिनींनी उमेदवार निवडून देताना विकास आणि विश्वासार्ह व्यक्तीमत्व यांची निवड केली तरच भविष्याचे चित्र बदलेल!

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सावधान! येथे बिबट्यांचा वावर आहे; रत्नागिरीतील ‘या’ १०५ गावांना सतर्कतेचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे अशा १०५ गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.

​बिबट्यांच्या संख्येत वाढ आणि मानवी वस्तीत शिरकाव

​वनविभागाच्या अंदाजानुसार, या परिक्षेत्रात सध्या सुमारे १०० ते १२५ बिबट्ये असण्याची शक्यता आहे. पूर्वी बिबट्यांचा अधिवास १० किमी परिसरात असायचा, मात्र संख्या वाढल्याने आता हा अधिवास ५ किमीपर्यंत मर्यादित झाला आहे. यामुळे शिकारीच्या शोधात बिबट्ये आता थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. पाळीव प्राण्यांवर आणि काही ठिकाणी माणसांवरही हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्या प्रवण गावांची यादी

​१. रत्नागिरी तालुका (सर्वात जास्त बाधित)

​जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, कर्बुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली.

​२. लांजा तालुका / परिसर

​धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.

​३. राजापूर तालुका

​पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसंवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे.

​४. संगमेश्वर तालुका / क्षेत्र

​फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसर, कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर.

​महत्त्वाची सूचना: वनविभागाने या १०५ गावांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसल्यास स्वतःहून त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे.

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on        

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

गुहागर : मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला, क्लिनर जखमी

   Follow us on        

गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

   Follow us on        

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुम्बई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाट मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जेसीबी व यंत्रसामग्रीच्या मदतीने रवी इन्फ्रा कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, घाट मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

   

Chiplun: जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा टेरव येथे साडेतीनशे किल्ल्यांचे सचित्र प्रदर्शन.

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूमधील १ अशा भारतातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को या संस्थेने महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण आहे. या ११ किल्ल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्याचाही समावेश झाल्यामुळे विशेष आनंद आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा या विषयी अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक मोने सर यांच्या संकल्पनेतून व संग्रहित ३५० किल्ल्यांचे सचित्र माहितीसह प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर प्रदर्शन व आनंदोत्सवाचे उद्घाटन टेरव गावचे मुंबई स्थित ग्रामस्थ व सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सुधाकर कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सुमन विद्यालय टेरवचे शिक्षक श्री भंडगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, सौ चिपळूणकर, सौ निशिगंधा कांबळे , श्री अनंत पवार, सौ स्नेहल गायकवाड, श्री प्रवीण सन्मुख, श्रीमती तनुजा मोहिते, हे शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या. या प्रदर्शनाचा लाभ सुमन विद्यालय टेरवचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा टेरव १ मधील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभार श्री प्रवीण सन्मुख यांनी मानले.

 

श्री दिपक मोने, मुख्याध्यापक

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा टेरव 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search