Category Archives: वाचकांचे व्यासपीठ

“सावंतवाडी टर्मिनस” व्हावे यासाठी कोकणी माणूसच आग्रही नाही?

सागर तळवडेकर |सावंतवाडी :या वर्षीचा गणेशोत्सवात चाकरमानी आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात रेल्वे प्रवास करत आपल्या गावी पोहोचलो खरे,परंतु चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, रेल्वे प्रशासनाला एकेरी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.अनेकांना ४-५ तास स्टेशन वर ताटकळत उभे राहावे लागले, गाडीतील अस्वच्छता, पाण्याची असुविधा, सदोष बोगी संरचना आदी, अनेक छोट्या मोठ्या अडचणी ह्या सर्व चाकरमान्यांना येताना आणि मुंबईला परतताना सहन कराव्या लागल्या, आणि पुन्हा एकदा कोकणात स्वतंत्र असे टर्मिनस व्हावे ही जुनी मागणी डोळ्या समोर आपसूकच आली.
पण दुदैर्व.. “सावंतवाडी टर्मिनस” व्हावे असे कोकणी माणसाला वाटतच नाही असेच दिसते. चाकरमाण्यांपासून मालवणी माणूस देखील याला अनुकूल नाहीच असे दिसते. सावंतवाडीत टर्मिनस व्हावे यासाठी पहिल्यांदा कै. वालावलकर,आणि स्वतः कोकण रेल्वेचे जनक कै. मधु दंडवते यांनी नियोजन केले, त्यांनतर २००६ पासून समाजवादी आमदार कै. जयानंद मठकर, त्यांनतर कै. डी के सावंत यांनी अथक प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले आणि त्याची पायाभरणी बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा पुढे नेणारे माजी खासदार श्री सुरेश प्रभू यांनी २०१५ ला केली. परंतु हे टर्मिनस आता निधी अभावी रखडणार आहे हे माझ्यासारख्या टर्मिनस प्रेमीला कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही. टर्मिनस साठी निधी नाही हे सांगत खासदार महोदयांनी आपले हात वर केलेत असेच काही दिसते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे बोलणे कितपत योग्य आहे हे येणारी निवडणुकीच ठरवेल.
काही जणांना टर्मिनस म्हणजे काय हे देखील माहित नसेल, त्यांसाठी मी थोडी त्याबद्दल माहिती देतो,रेल्वेचे टर्मिनस ज्या ठिकाणी प्रस्तावीत होते म्हणजेच त्या ठिकाणाहून रेल्वे सुरू करण्याचे / सोडण्याचे नियोजन करण्यात येते, रेल्वे सोडताना तेथे रेल्वे उभी करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे बोगी धुण्याची सोय, पाणी भरण्याची सोय, आदी कामे केली जातात. जेणेकरून भविष्यात या टर्मिनस वरून काही गाड्या ह्या चालवण्यात येतील, त्या गाडीची देखभाल केली जाईल. ही सर्व कामे सध्या गोव्यातील मडगाव येथे केली जातात,परंतु सध्याचा घडीला मडगाव स्टेशन हे गणेशोत्सवातील किंवा इतर मोठ्या सण किंवा उत्सवाला अतिरिक्त भार घेण्यास सक्षम   नाही. त्यामुळे कोकणातील या गर्दीचा भार उचलण्याचे काम सावंतवाडी टर्मिनस ने नक्की केले असते, जेणेकरून स्पेशल गाड्यांचे / दुप्पट दरात तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसता. म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की टर्मिनस, ते देखील रेल्वेचे टर्मिनस होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर प्रवासादरम्यान असे वाईट अनुभव हे येतच राहतील.
माझ्या मते हा विषय केवळ सावंतवाडी पुरती मर्यादित नसून हा मुंबई आणि कोकण या दोन्ही भागांचा आहे कारण कोकणातील अर्धी मंडळी ही मुंबईला पोटापाण्यासाठी आहे आणि ही मंडळी आपला प्रत्येक सण आपल्या घरी म्हणजेच कोकणात येऊन साजरे करतात त्यामुळे ह्या जिव्हाळ्याचा विषयाला आज आलेल्या खासदारांचा विधानाने कुठेतरी कोकणी माणूस दुखावला असेल असेच दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की सावंतवाडी टर्मिनस होणे ही आजची खरी गरज आहे. आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती

Loading

गणेश चतुर्थी २०२३: अपुरी सुविधा उपलब्ध असणार्‍या रेल्वे स्थानकांवर गरज आहे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीची

वाचकांचे व्यासपीठ :कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील गर्दीवर नियंत्रणासाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीकरिता स्वयं सेवक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे.गणपती विसर्जन ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था सेवा देतात. अनिरुद्ध अकॅडमी, संत निरंकारी मिशन ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे अनेक संस्था आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी व निर्माण झाल्यानंतर सेवा देतात. त्याच धर्तीवर कोकण गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी मदत होईल. कोकणातील रेल्वे स्टेशन बस स्थानके येतील सेवा सुविधांचा अभाव आहे .काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांची भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम ही पण एक गणपती बाप्पा चरणी सेवा अर्पण होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल या स्थानकावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी आणि नियोजनाअभावी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे कोकणातील स्थानकांवरील अपुऱ्या सुविधांमुळे येणार्‍या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी यात लक्ष घालून मदत केल्यास कित्येक चाकरमानी प्रवाशांचा त्रास नक्किच कमी होईल. 

 भालचंद्र माने.नेरूळ, नवी मुंबई.

Loading

कोकण हळू हळू ‘म्हातारं’ होत चाललय….

हल्लीच माझे गावी जाण झालं, २ दिवस राहून परतीचा प्रवास सुरवात केला, कायमच गावावरून निघताना चाकरमानी माणसाचे डोळे भरतात, पाय जागचे हलत नाहीत पण आज कायतरी वेगळंच वाटत होतं, जाणवत होतं… 

असे का, याचा विचार डोक्यात सतत सूरु होता. मला असे का सतत वाटतंय याच उत्तर थोड्यावेळाने मिळालं ते म्हणजे.. “कोकण वृद्ध झालेय, म्हातारे होतंय…

जन्मवयापासूनच गावची ओढ असल्याने कायमच शाळा संपली की गावी येणे व्हायचं, त्यानंतर चतुर्थी असा योग जमायचा. कालांतराने नोकरीत यात्रा-जत्रांना सुद्धा येणे सुरू झाले, या कालावधीत कोकण बदलत होत तशी कोकणातली माणसे सुद्धा बदलत होती सर्व दिसत होतं पण लक्षात येत न्हवत आज त्याची जाणीव झालीय.

गेली ३०-३५ वर्षे आपल्या आजुबाजुला असणारे चुलते, काका, वाडीतली इतर जुनी माणसे आज वयाच्या ७० मध्ये आहेत, ५०च्या दशकात जन्माला आलेली आणि खडतर जीवन जगून इथपर्यंत आलेली ही पिढी आज थकलीय, जीवनाच्या शेवटच्या टप्यात येताना मागे सोसलेल्या अनेक घटना त्यांना आनंद, दुःख देत असतील पण सांगायाच बोलायचं कोणाला हा प्रश्न त्यांच्या समोर असेल. प्रत्येक गावात अशी जाणकार जुनी मंडळी असतील जी आज म्हातारी झालीत, एकवेळ गावच्या मिटिंग आणि सर्व सोपस्कार पाडण्यास पुढे असणारे असे हे लोक आज डोळ्यावर काळा चष्म्या लावून हातात काठी घेऊन चाचपडत फिरतायत. सकाळी ढोर सोडण्यापासून संध्याकाळी घराकडे परतेपर्यंत सतत पायपीट करणारी, ही पिढी दुकानात जायला बाईक घेउन धावणाऱ्या तरुणाईला समजून घेता येईल का ? अशी अनेक माणसे ज्यांनी मोठी कुटुंब सांभाळली, मुला बाळांची लग्न लावून दिली, आज नातवंडे खेळवतायत त्याच्या परिस्थितीकडे पाहून खूप वाईट वाटते. सतत असे वाटत की एक चालती बोलती पिढी संपून जाईल. 

गावात, वाडीत, घरात लग्न-सराई सन-सुद करताना यांची असणारी धावपळ आज हे थकल्यावर जाणवते, यांनीच घर कुटुंब सांभाळून सर्व परंपरा जपल्या आज ती माणसे गावच्या तरुणाईसमोर कुठंतरी मागे पडलीत, हातात मोबाईल, बाईक आणि आमकां सगळा माहिती हा या नादात आपण आपल्या सोबत असणाऱ्या चालत्या बोलत्या पुस्तकाला अडगळीत टाकतोय हे आपल्याला समजतंय का ? 

त्यांचा अनुभव, ज्ञानसंपदा, याची माहिती आपण करून घ्यायची गरज आहे, त्यांनी जपलेला पूजलेला इतिहास आपल्यासोबत पुढच्या पिढ्याना सांगण्याची गरज आहे. ही अशी माणसे आहेत जी एकदा गेली की त्यांची जागा कधीच कोणी भरून काढू शकणार नाही, म्हणून म्हणतोय “कोकण म्हातार होतंय” त्या प्रत्येक म्हाताऱ्या कोकणाला आपण आधार देऊन सांभाळन्याची सध्या गरज आहे. त्यांची विचारपूस करण्याची गरज आहे.

माझा चुलता, माझा भाऊ, माझा मामा, हा आज जे पण आहे पण त्यांनी माझ्यासोबत घालवलेल्या मागच्या क्षणांच मोल हे अमूल्य आहे, आज आपल्याला गरज आहे त्यांच्यासाठी वेळ काढण्याची त्याना आनंद देण्याची..नक्की विचार करा!!

–एक वाचक 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search