मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!
Follow us onमुंबई/सावंतवाडी:
“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.
सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.
बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा
दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.
‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!
”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”
— एक व्यथित कोकणी चाकरमानी











