रत्नागिरी: जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.(Latest Marathi News)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली आहे. नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे.