Bus Accident :समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्ण जळले असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमीं प्रवाशांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.