मुंबई –कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारणाऱ्या सौदी अर्माको ही कंपनी आता आपले लक्ष ईतर देशातील प्रकल्पामध्ये वळवताना दिसत आहे. या कंपनीने चीनमध्ये मोठा रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी नुकताच करार केला असून, चीनमधीलच आणखी एका प्रकल्पाचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.त्यामुळे कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणात रिफायनरी प्रकल्प उभा करण्याची घोषणा २०१६ साली झाली होती. आधी हा प्रकल्प नाणार इथे होणार होता. स्थानिकांचा विरोध झाल्याने नंतर बारसू इथे हा प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बारसू इथेही विरोध होत आहे. त्यात अजून या प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागा संपादित व्हायची आहे. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे सौदी आर्माको या कंपनीने आपले लक्ष आपल्या इतर देशातील प्रकल्पाकडे वळविल्याचे दिसत आहे.
मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गोष्टीचा परिणाम बारसू येथील रिफायनरीवर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिफायनरीला होणारा विरोध कमी झाला असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे ते म्हणाले.