रत्नागिरी| मुंबई – गोवा महामार्ग अपूर्ण असताना सरकारद्वारे पुन्हा पुन्हा या मार्गावर टोल वसुलीसाठी प्रयत्न केला जात आहे. दिनांक 11 एप्रिल 2023 ला सुद्धा राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका सुरू करून टोल वसुली चालू झाली होती. महामार्ग अपूर्ण असताना टोल वसुली का असा प्रश्न प्रसारमाध्यमांतून पत्रकारांननी उठवला होता. पत्रकारांच्या दबावापुढे अखेर सरकारला नमावे लागले. मंगळवारी सुरू केला गेलेला राजापूर – हातिवले टोल नाका एका दिवसातच म्हणजे काल बुधवारी सायंकाळी बंद केला गेला.
हातीवले येथील टोलवसुली पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जोवर तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत तेथील टोल वसुली सुरू केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला पत्रकारांनी प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. येथील स्थानिकांचा विरोधही होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
.